उपवासाच्या निमित्ताने चाखून पहा वरईच्या तांदुळाचा ढोकळा

dhokla
गुढी पाडव्याला चैत्र नवरात्र सुरु होत आहे. या दिवसांमध्ये अनेकांच्या घरी नवरात्र बसत असून, त्या निमित्ताने उपवासही केले जातात. उपवास म्हटला की ताजी फळे, साबुदाण्याची खिचडी, भगर, दाण्याची आमटी, रताळ्याचा किंवा बटाट्याचा कीस, राजगीऱ्याचे लाडू इत्यादी पदार्थांची मेजवानी असते. मात्र या वेळी उपवासाच्या निमित्ताने वरईच्या तांदुळाचा ढोकळा हा एक आगळा वेगळा पदार्थ करून पाहावा. उपवासासाठी खाल्ल्या जाणाऱ्या वरईच्या तांदुळापासून हा पदार्थ बनविला जात असून यासाठी एक कप वरईचे तांदूळ, एक कप दही, दोन मोठे चमचे तेल, चवीनुसार सैंधव, पाव चमचा सोडा, बर्क चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, पाव चमचा आल्याची पेस्ट, एक चमचा साखर, अर्धा चमचा जिरे आणि पाच सहा कढीपत्त्याची पाने इतक्या साहित्याची आवश्यकता आहे.
dhokla1
ढोकळा बनविण्यासाठी सर्वप्रथम वरईचे तांदूळ कोरडेच मिक्सरवर जर जाडसर दळून घ्यावेत. जाडसर दळून झाल्यानंतर यामध्ये दही, आणि एक चमचा तेल घालावे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार सैंधव, आणि साखर घालवी. हे मिश्रण एकजीव करून अर्धा तास झाकून ठेवावे. अर्ध्या तासानंतर या मिश्रणामध्ये चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, आल्याची पेस्ट, आणि चिमुटभर खाण्याचा सोडा घालावा. चांगले ढवळून घेऊन हे मिश्रण एकजीव करावे. अशा रीतीने ढोकळ्याचे पीठ तयार होते.
dhokla2
कडा असलेल्या ताटलीला किंवा केक बनविण्याच्या भांड्याला थोडेसे तेल लावून घेऊन हे तयार झालेले ढोकळ्याचे पीठ त्यामध्ये घालावे. त्यानंतर हे पीठ स्टीमरमध्ये ठेऊन वाफेवर पंधरा मिनिटे शिजू द्यावे. स्टीमर नसल्यास मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळून, पातेल्यामध्ये एक स्टीलचा ग्लास ठेऊन त्यावर पीठाचे भांडे ठेवावे आणि झाकण घालावे. पीठ पूर्ण शिजल्यानंतर स्टीमरमधून ढोकळा काढून घ्यावा. एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. हे फोडणी ढोकळ्यावर पसरून वड्या कापाव्या.

Leave a Comment