अकारण हॉर्न वाजविणे कमी करण्यासाठी लहानगीने सुचविला आनंद महिंद्रा यांना उपाय

anand-mahindra
नामांकित उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मिडीयावर सक्रीय असून, त्यांचे भरपूर फॉलोअर्सही आहेत. आपल्या व्यस्त जीवनात आपल्याला येत असणारे निरनिराळे अनुभव आनंद महिंद्रा मोठ्या रोचक शैलीमध्ये सोशल मिडीयावर शेअर करीत असल्याने त्यांच्या पोस्ट्स ‘फॉलो’ करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अलीकडेच आपल्याला आलेले एक पत्र आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर शेअर केले आहे. हे पत्र महिंद्रा यांना मुंबईमध्ये राहणाऱ्या महिका मिश्रा नामक अकरा वर्षीय लहानग्या मुलीने लिहिलेले आहे.

या पत्रामध्ये महिकाने आपल्याला गाडीमध्ये बसून फिरायला जाणे फार आवडत असून, रस्त्यातील इतर वाहने मात्र अकारण सतत हॉर्न वाजवीत असल्याचे मात्र आपल्याला अजिबात पसंत नसल्याचे लिहिले आहे. विनाकारण सातत्याने हॉर्न वाजविण्याची सवय इतर वाहचालाकांसाठी अतिशय त्रासदायक ठरत असून, त्यामुळे ध्वनी प्रदूषणही वाढत असल्याने हे टाळण्याकरिता जाही तरी कायमस्वरूपी उपाय करण्याची आवश्यकता असल्याचे महिकाला वाटते. महिकाने स्वतः होऊनच या प्रश्नावर उपायही सुचविला आहे.

महिकाच्या मतानुसार प्रत्येक गाडीमध्ये असा हॉर्न बसविला जावा, जो दहा मिनिटांमध्ये केवळ पाचच वेळा वाजू शकेल, आणि प्रत्येक वेळी हॉर्न वाजविला असता त्याचा ध्वनी केवळ तीन सेकंदांपुरता मर्यादित असेल. यामुळे विनाकारण हॉर्न वाजविण्याची लोकांची सवय कमी होईल, इतर वाहनचालकांना ही सतत हॉर्नच्या आवाजाने त्रास होणार नाही आणि ध्वनी प्रदूषणही नियंत्रित राहील असा उपाय महिकाने आपल्या पत्रातून महिंद्रा यांना सुचविला आहे.

आनंद महिंद्रा हे ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या भारतातील नामांकित वाहनउद्योग समूहाचे चेअरमन असून त्यांना महिकाने सुचविलेला उपाय खूपच आवडला आहे. महिकाचे हे पत्र त्यांनी आपल्या ट्वीटर हँडल वरून शेअर करीत आपली प्रतिक्रिया देखील पोस्ट केली आहे. दिवसभराची कामाची धावपळ संपवून सायंकाळी थकून घरी आल्यानंतर मिळणाऱ्या मोकळ्या वेळामध्ये आपल्याला आलेली अशी छान पत्रे पहिली, की कामाचा थकवा कुठल्या कुठे निघून जात असल्याचे महिंद्रा म्हणतात. त्याचबरोबर महिकासारख्या विचारांच्या पुढच्या पिढीसाठी काम करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचे समाधानही महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे. महिंद्रा यांनी शेअर केलेल्या ट्वीटला काहीच तासांच्या आत हजारो ‘लाईक’ आले असून, यावर लोकांनी या लहानगीच्या समजूतदारपणाचे कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Leave a Comment