खोटी दाढी आणि लुंगी परिधान करून चेन्नईमध्ये मॅथ्यूू हेडनची भटकंती

mathwe-heydan
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू त्यांचा बिनधास्तपणा आणि रोचक जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. या खेळाडूंमध्ये आपल्या फलंदाजी करिता विख्यात असलेल्या मॅथ्यू हेडनचा ही समावेश आहे. धमाकेदार फलंदाजी साठी ओळखल्या जाणाऱ्या या विश्वविख्यात खेळाडूचा भारतावर मात्र विशेष जीव आहे. म्हणूनच कधी होळीच्या रंगांत रंगलेल्या, तर कधी मंदिरामध्ये मोठ्या श्रद्धेने पूजा करत असणाऱ्या हेडनची अनेक छायाचित्रे सोशल मिडीयावर नेहमीच व्हायरल होत असतात. अलीकडेच हेडनच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये मात्र हेडन आगळ्याच रूपामध्ये पहावयास मिळाला.
mathwe-heydan1
एके काळी टी-20 लीगमध्ये चेन्नईच्या वतीने खेळणारा मॅथ्यू हेडन अलीकडे टीव्हीवर कॉमेंटेटर म्हणून दिसतो. दोनवेळा जगज्जेतेपद मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटसंघामध्ये समाविष्ट असलेल्या हेडनला काही दिवसांपूर्वी चेन्नईमधील बाजारामध्ये काही वस्तूंचे मोलभाव करताना पाहिले गेले. चेन्नई मधील सुप्रसिद्ध ‘टी नगर’ येथील बाजारामध्ये हेडन काही वस्तूंचे मोलभाव करीत होता. अखेरीस घासाघीस करण्याच्या हेडनच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याला हवे असलेले घड्याळ त्याने त्याला हव्या असलेल्या किंमतीत मिळविले. पण इतके सर्व करीत असताना आपल्याला कोणी ओळखू नये याची पुरेपूर काळजी हेडनने घेतली होती.

वास्तविक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न याने सर्वांना एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत काही वस्तू खरेदी करून आणण्याचे आव्हान दिले असता, या आव्हानाचा स्वीकार करीत हेडन खरेदीसाठी बाहेर पडला होता. ही खरेदी करताना आपली खरी ओळख लपविण्यासाठी मात्र हेडनने नकली दाढी आणि लुंगी असा पेहराव करून हजार रुपयांच्या पेक्षाही कमी किंमतीत पुष्कळशा वस्तू खरेदी केल्या असल्याचे समजते. लुंगी परिधान करण्याची हेडनची ही पहिलीच वेळ नसून, या पूर्वीदेखील हेडनने टी-शर्ट आणि लुंगी असा पेहराव परिधान करून क्रिकेटच्या पिचवरून चौकार, षटकार मारले आहेत.

Leave a Comment