रिंकू राजगुरुच्या कागरमधील पहिले गाणे रिलीज

rinku-rajguru
काही दिवसांपूर्वीच सैराट फेम रिंकू राजगुरुच्या आगामी कागर या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. रिंकूच्या चाहत्यांनी चित्रपटाच्या टीझरला भरभरुन प्रतिसाद दिला. या चित्रपटाची कथा राजकारणाला केंद्रस्थानी ठेवून गुंफण्यात आल्याचे जाणवते. टीझर पाठोपाठ नुकतेच चित्रपटातील पहिले गाणे ‘लागलीया गोडी तुझी’ हे रिलीज करण्यात आले आहे. ‘लागलीया गोडी तुझी’ हे एक प्रेमगीत असून या गाण्याचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी केले आहे. तसेच शशा तिरुपती आणि हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणे गायले आहे. गाण्यातील संगीत आणि चाल लक्षात घेता हे गाणे सुद्धा खुप गाजेल अशी आशा आहे.

रिंकुचा दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर चित्रपट येत असल्याने कागर विषयी प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे. कागर १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात येणार होता. पण रिंकुची फेब्रुवारीमध्येच बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला होता, असे निर्माते विकास हांडे आणि सुधीर कोलते यांनी स्पष्ट केले होते.

‘कागर’ या चित्रपटाची निर्मिती सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या उदाहरणार्थ या निर्मिती संस्थेने केली आहे.तसेच चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्दर्शक मकरंद माने यांनी केले आहे. येत्या 26 एप्रिलला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment