लॉकहीड मार्टिन – 114 विमानांसाठी पाकिस्तानच्या नामुष्कीवर पांघरूण

lockheed-martin
भारताच्या हवाई दलाने 27 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथे केलेल्या हवाई कारवाईत पाकिस्तानी एफ-16 विमान पडल्याचा दावा केला होता. या विमानाच्या वैमानिकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. मात्र आता ते विमान मुळात पाडण्यात आलेच नव्हते, असा दावा या विमान निर्मात्या कंपनीने केला आहे. भारताच्या एका जुनाट विमानाने अत्याधुनिक म्हणल्या जाणाऱ्या अमेरिकी विमानाला धूळ चारली. यामुळे फजिती झालेल्या अमेरिकेने अशा प्रकारे आपल्या त्रुटीवर पांघरूण घालणे सुरू ठेवले आहे.

‘फॉरेन पॉलिसी’ नावाच्या एका प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झालेल्या वृत्तांतानुसार,अमेरिकेने केलेल्या मोजणीत पाकिस्तानचे कोणतेही एफ-16 लढाऊ विमान नाहिसे झालेले नाही.

अमेरिकी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानातील एफ-16 विमानांची मोजणी केली आणि तेव्हा सर्व विमाने जागच्या जागी असल्याचे त्यांना आढळले, असे या नियतकालिकाने म्हटले आहे. “ही माहिती थेट भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या दाव्याच्या उलट आहे. त्यांनी म्हटले होते, की विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी एक पाकिस्तानी एफ-16 विमान पाडले होते. युद्धाच्या घाई-गडबडीत जुन्या मिग-21 बायसन विमान उडविणाऱ्या वर्धमान यांनी पाकिस्तानी एफ-16 वर निशाणा साधलाही असेल, त्यांनी हल्ला केलाही असेल आणि त्यांना खरोखर वाटले असेल, की त्यांनी विमान पाडले आहे,” असे या अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मात्र भारतीय हवाई दलाशी संघर्षात पाकिस्तानी एफ-16 सामील असल्याचे पुरावे मिळाले आहेत, याची पुष्टी या अधिकाऱ्यांनी केली आहे. भारतीय हवाई दलाने 28 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी एफ-16 मधून सोडण्यात आलेल्या एएमआरएएएम क्षेपणास्राचे तुकडे दाखवले होते. अमेरिकेत तयार होणाऱ्या एआयएम-120 क्षेपणास्राचा मारा करण्याची क्षमता केवळ एफ-16 विमानाकडे आहे. बालाकोटमधील घटनेनंतर भारताने अमेरिकी सरकारकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. भारताविरोधात एफ-16 विमानाचा वापर पाकिस्तानने केल्याचा पुरावा मिळाला असता, तर तो अमेरिकेच्या निर्बंधाचे उल्लंघन ठरले असते.

या वादामुळे काही विमाने तत्काळ निरीक्षणासाठी उपलब्ध नव्हते, त्यामुळे या विमानांच्या मोजणीला काही आठवड्यांचा वेळ लागला, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले. अर्थात या नियतकालिकाने अधिकाऱ्यांची नावे जाहीर केलेली नाही. अमेरिकी विदेश मंत्रालय तसेच भारतीय आणि पाकिस्तानी दूतावासाकडून या वृत्तावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

गंमत म्हणजे एफ-16 विमानांचा वापर झाला असावा, असे संकेत पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी 1 एप्रिल रोजी दिले होते. “पाकिस्तानी वायुसेनेचा संपूर्ण ताफा हवेत असताना एफ-16 भी वापर झाला असला तरी पाकिस्तानी वायुसेनेने दोन भारतीय विमाने आत्मरक्षणासाठीच पाडली, हे वास्तव कायम राहते,” असे त्यांनी म्हटले होते.

यातली गोम अशी, की लॉकहीड मार्टिन ही कंपनी भारताला आपली विमाने विकू पाहते. मात्र मुख्यतः पाकिस्तानला ती विमाने पुरवत असल्यामुळे भारताने तिला धूप घातलेली नाही. शिवाय रशियन बनावटीच्या मिग विमानांवर भारताचा जास्त विश्वास आहे. लॉकहीड मार्टिनने 1980 पासून पाकिस्तानला ही विमाने पुरवली आहेत. आता ती भारताला अत्याधुनिक विमाने देऊ पाहत आहे. मात्र भारताच्या जुन्या मिग 21 विमानाने एफ 16 पाडले म्हटल्यावर हा सौदा संकटात आला.

“भारताच्या मिग-21ने केवळ पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16च पाडले नाही, तर लॉकहीड मार्टिन आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपन्यांवरही हा सर्जिकल स्ट्राईक होता. भविष्यात भारतीय हवाई दलाशी कोणताही व्यवहार करण्याची गोष्ट त्यांनी विसरून जावी,” असे जामिया मिलिया इस्लामिया अॅकॅडेमी ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे तज्ञ सय्यद मोहम्मद मुर्तझा यांनी तेव्हा म्हटले होते.

केवळ भारतासाठी नवीन ‘एफ्-२१’ ही लढाऊ विमाने बनवून देण्याची तयारी ‘लॉकहीड मार्टिन’ने दाखवली आहे. भारतीय हवाई दलाच्या आवश्यकतेनुसार ही विमाने बनवून देण्यात येणार आहेत. तसेच या विमानांचे उत्पादन भारतातच करण्यास कंपनी तयार आहे. तसे झाले तर हवाई दलाकडून तब्बल 114 लढाऊ विमानांचे कंत्राट लॉकहीड मार्टिनला मिळेल. हे कंत्राट मिळवण्यासाठी 4 ते 5 कंपन्या प्रयत्न करत आहेत. हे कंत्राट आपल्या हातातून जाऊ नये, यासाठी लॉकहीड मार्टिनची धडपड आहे. अन् त्यासाठी पाकिस्तानच्या नामुष्कीवर पांघरूण टाकण्याचे हे प्रयत्न होत आहे.

Leave a Comment