अडवानी- मोदी – सामना गुरु-शिष्याचा!

lalkrishan-advani
ज्येष्ठ नेते व देशाचे माजी उपपंतप्रधान लकृष्ण अडवाणी नाराज आहेत का नाहीत, हे त्यांनी अजून तरी उघडपणे सांगितले नाही. मात्र तिकीट नाकारल्यानंतर आपल्या पहिल्याच सार्वजनिक टिप्पणीद्वारे भाजपला अडचणीत आणण्यात ते यशस्वी झाले, यात शंका नाही. अडवानी यांनी ब्लॉग लिहून एक संदिग्ध असे वक्तव्य केले. त्यातून त्यांचे शिष्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणी येतील अशी अपेक्षा होती. मात्र अडवाणी यांचे चेले असलेल्या मोदी यांनी त्यांची तारीफ करून पलटवार केला. देशाच्या लोकसभा निवडणुकीत विविध प्रकारचे रंग उधळले जात आहेत. त्यामध्ये या गुरु-शिष्याची लढाई एक वेगळाच रंग उधळणार आहे.

मोदी आणि अडवानी या गुरु-शिष्याची जोडी आगळीच! अडवानींची आणि मोदी यांचे संबंध तब्बल 30 वर्षे जुने. आधी ते गुरु-शिष्याचे होते, नंतर सौहार्दाचे आणि आता वितुष्टाचे आहेत. मोदी आणि अडवानी यांची पहिली भेट 1975 मध्ये झाली होती. “मी जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हा अडवानींच्या मुलाखतीतून मला खूप प्रेरणा मिळायची. अडवानींच्या विचारांशी माझी नाळ जुळते. त्यामुळेच माझे विचार अधिक राष्ट्रप्रेमी झाले,” असे मोदींनी एका मुलाखतीत सांगितले होते. मात्र 2005 पासून या दोघांमध्ये अंतर पडायला सुरूवात झाली. नरेंद्र मोदी यांची प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर अडवानी यांनी राजीनामा दिला होता. मात्र स्वतः मोदींसकट भाजप नेत्यांनी अडवानी यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी तो राजीनामा मागे घेतला होता.

भाजप आणि देशाच्या एकंदर राजकारणात नरेंद्र मोदी हे सर्वाधिक तंत्रज्ञानस्नेही नेते मानले जातात. खासकरून सोशल मीडियाचा उपयोग करण्यात त्यांचा हातखंडा मानण्यात येतो. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदापर्यंत त्यांनी जी झेप घेतली त्या या सोशल मीडियाचा वापर मोठा होता. मात्र त्यांना राजकारणात आणणारे व कार्यकर्ता-नेता अशी त्यांची जडणघडण करणारे लालकृष्ण अडवानी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 2004 मध्ये सत्ता गमावली. त्यानंतर लगेच अडवाणी यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. त्यावेळी ब्लॉग हे माध्यम नवीन होते. त्याचा खुबीने वापर अडवाणी यांनी केला. मात्र 2009मध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर अडवाणी यांनी ब्लॉगलेखन काही बंद केले होते. धूर्त राजकारणी असलेल्या अडवाणी यांनी दहा वर्षानंतर तेच अस्त्र बाहेर काढले. निमित्त झाले गांधीनगर येथून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी न मिळाल्याचे!

आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये अडवाणी यांनी भाजपच्या धोरणे आणि सिद्धांतांची चर्चा केली आहे. आम्ही आमच्या राजकीय विरोधकांना शत्रू किंवा देशविरोधी कधीही मानले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

“सर्वात आधी देश, त्यानंतर पक्ष व त्याच्यानंतर प्रकार हा माझ्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतावर आयुष्यभर वाटचाल करण्याचा मी प्रयत्न केला आहे व तो पुढेही करत राहील,” असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी आपल्या राजकीय जीवनाच्या आठवणीही जाग्या केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय पक्षांनी आत्मनिरीक्षण करावे, असे सांगताना वैविध्य आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे भारतीय लोकशाहीचे सार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून देशातील मोकळे वातावरण संपुष्टात आले आहे. विरोधकांना देशाचे शत्रू ठरवण्यात येत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. अडवानी यांनी यांनी त्या आरोपाला खतपाणी पुरवले आहे. वास्तविक अशा प्रकारचे मतप्रदर्शन त्यांनी यापूर्वीही केले होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपमधील अंतर्गत लोकशाही संपली असून देशातही आणीबाणीच्या काळाची आठवण करून देणारे वातावरण आहे, असे म्हटले होते.

मात्र यावेळेसचे त्यांचे मतप्रदर्शन भाजप नेत्यांना बोचणारे आहे. कारण देशात निवडणुका सुरू आहेत आणि मोदी यांच्यावर भाजपची मुख्य मदार आहे. मोदी यांच्या गुरूंनीच त्यांच्यावर शरसंधान करावे, हे विरोधकांच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. बहुधा याचीच जाणीव झाल्यामुळे असावे कदाचित परंतु मोदी यांनी गुरुची विद्या गुरुला या न्यायाने वागायचे ठरविले असावे.

त्यांनी अडवाणी यांना महान नेता म्हटले असून त्यांचे कार्यकर्त असणे, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या ब्लॉगचीही तारीफ केली आणि ट्विटरवरून त्याची लिंकसुद्धा शेअर केली. थोडक्यात म्हणजे अडवाणी आणि आपल्यामध्ये कुठलाही बेबनाव नसल्याचे त्यांना दाखवायचे आहे. कारण मतदानाला अजून दीड महिना आहे आहे आणि अडवानींसारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेली टीका विरोधक आपल्या विरोधात वापरणार, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.

Leave a Comment