कलिंगडाची निवड करताना…

watermelon
उन्हाळा आला, की आंबे, कैऱ्या, या चविष्ट मेव्या बरोबरच कलिंगडासारख्या फळांची मागणीही भरपूर वाढते. रसदार, आणि अवीट गोडीचे, शरीराला थंडावा देणारे असे हे फळ आहे. मात्र कलिंगड निवडताना ते आतून कसे निघेल हे केवळ बाहेरून कलिंगड पाहून ठरविता येणे काहीसे कठीण असते. त्यामुळे अनेकदा आकराने चांगले, असलेले कलिंगड आवर्जून घेतले, की ते बेचव निघण्याची शक्यता असते. म्हणूनच कलिंगड निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे आहे. एखाद्या कलिंगडाच्या सालीवर भुरकट डागांची जाळी दिसून येतात. फळ तयार होण्यापूर्वी वेलीवर आलेल्या फुलाला फुलांतून पराग गोळा करणाऱ्या मधमाश्यांचा अनेकदा स्पर्श झाला असल्याची ती खूण आहे. जितका मधमाश्यांचा स्पर्श अधिक तितकी अधिक भुरकट जाळी फळावर दिसून येते, आणि जितके भुरकट डाग अधिक, तितके फळ गोड असे हे एकंदर गणित आहे.
watermelon1
कलिंगड ज्या ठिकाणी जमिनीवर टेकून वाढलेले असते, त्या भागाला ‘फील्ड स्पॉट’ म्हटले जाते. तो कलिंगडाचा भाग पिवळा किंवा केशरी रंगाचा दिसून येतो. जर कलिंगड पिकून तयार असले, तर हा भाग पिवळट केशरी रंगाचा दिसतो आणि जर कलिंगड तयार नसेल तर हा भाग पांढरा दिसतो. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना आधी फील्ड स्पॉटचा रंग पाहण्यास विसरू नये. कलिंगड खरेदी करताना त्याचे आकारमानही अवश्य विचारात घ्यावे. कलिंगड आकाराने फार लहान किंवा फार मोठे असू नये. आपण निवडत असलेले कलिंगड मध्यम आकाराचे असावे. तसेच कलिंगडाचा आकार जरी मध्यम असला, तरी ते वजनाला जड असावे.
watermelon2
कलिंगडामधे देखील ‘नर’ कलिंगड आणि ‘मादी’ कलिंगड असतात, याची माहिती पुष्कळांना नसते. त्यामुळे आपण खरेदी करीत असलेले कलिंगड जर मोठे आणि लंबगोल आकाराचे असेल, तर ते नर कलिंगड असते आणि ते चवीला काहीचे पाणचट लागते. मादी कलिंगड मात्र आकाराने गोल गरगरीत असून हे चवीला गोड असते. कलिंगड निवडताना त्याचे देठ पाहून घ्यावे. जर कलिंगडाचे देठ पूर्ण वाळलेले असेल तर ते कलिंगड खाण्यास तयार असल्याचे ओळखावे. पण जर कलिंगडाचे देठ हिरवे असेल, तर हे कलिंगड पिकण्याआधीच तोडले गेले आहे असे समजावे. एकदा वेलीवरून तोडलेले कलिंगड पिकत नाही. त्यामुळे कलिंगड निवडताना देठ पूर्ण वाळलेले कलिंगड निवडावे.

Leave a Comment