उन्हाळ्यामध्ये कुलरचा वापर करताना…

cooler
आताच्या दिवसांमध्ये ऊन्हे चांगलीच तापू लागली आहेत. उकाडा असह्य होऊ लागल्याने केवळ पंख्याचा वारा पुरेनासा झाला आहे. त्यामुळे बहुतेकांनी आपल्या घरांमध्ये, किंवा कामाच्या ठिकाणी थंडावा मिळण्यासाठी एसी, किंवा कूलर्सचा वापर सुरु केला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरातील खोल्या किंवा कामाच्या ठिकाणी कूलर्सचा वापर वाढला आहे. मात्र कूलर वापरताना त्याचा वापर योग्य प्रकारे केल्यास खोलीमधले उष्ण तापमान जलद थंड होते. कूलर नेहमी खुल्या जागेमध्ये ठेवलेला असावा. तसेच त्यावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही अशा बेताने कूलर ठेवलेला असावा. जर कूलरवर सूर्यप्रकाश येणे टाळण्यासारखे नसले, तर ज्यावेळी सूर्यप्रकाश कूलरवर पडतो, त्यावेळी कूलरवर एखादी सुती चादर पसरावी. राजस्थानसारख्या अति उष्ण प्रांतांमध्ये अनेकदा लोक कूलरच्या मागील पॅनलवर एका बाजूने पाण्यामध्ये भिजविलेले पोते घालून ठेवतात. त्यामुळे कूलरमधून येणारी हवा लवकर थंड होते.
cooler1
अनकेदा खोलीमध्ये कूलरच्या हवेमुळे दमटपणा निर्माण होतो, असा दमटपणा निर्माण झाल्यास खोलीमध्ये पुरेशी हवा खेळत नसल्याचे हे लक्षण आहे. अशा वेळी खोलीतील दरवाजा किंवा एखादी खिडकी उघडून ताजी हवा खोलीमध्ये खेळू द्यावी. त्यामुळे खोलीतील दमटपणा कमी होण्यास मदत होईल. कूलरमधील पॅनल्स वर कोरड्या गवताचे पॅडिंग असते. ही पॅडिंग कालांतराने पाण्यामुळे खराब होऊ लागतात. तसेच यांवर धूळ साचल्याने या पॅडिंगमधील छिद्रे बंद होऊन कूलरमध्ये हवा खेळती राहू शकत नाही. त्यामुळे ठराविक वेळानंतर ही गवताची पॅडिंग बदलून त्याऐवजी नवी पॅडिंग लावावीत.
cooler2
कूलर वापरण्यास सुरुवात करण्यापूर्वी कूलरचा पंखा आणि आतील पाण्याचा पंप स्वच्छ करून आवश्यक असल्यास त्याला ऑईलिंग करावे. कूलरमध्ये असलेले पाण्याचे पाईप्सही स्वच्छ असल्याची आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा साचला नसल्याची खात्री करून घ्यावी.

Leave a Comment