सर एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे यांनी 1953 मध्ये सर्वप्रथम माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च पर्वतशिखरावर पाय ठेवला. तेव्हापासून 4,000 हून अधिक गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर चढाई केली आहे. त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, की त्यांनी पाय ठेवलेल्या या पर्वतशिखरावर एक दिवस कचऱ्याचे साम्राज्य पसरेल. आज या पर्वतशिखरावरील प्रदूषणाची पातळी नवी उंची गाठत आहे.
एव्हरेस्टच्या शिखराला धोका कचऱ्याच्या डोंगराचा!
नेपाळमधील काठमांडू पोस्ट या वृत्तपत्राने सोमवारी छापलेल्या एका वृत्तात या समस्येकडे लक्ष वेधले आहे. माउंट एव्हरेस्टकडे आजही मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या गिर्यारोहकांची रांग लागलेली असते, मात्र हे पर्यंटक आपल्यामागे सोडून जाणाऱ्या कुरूप पाऊलखुणांकडे फारसे लक्ष देत नाहीत, असे या वृत्तात म्हटले आहे. येथे सांडलेला कचरा बर्फाळ हवामानामुळे चटकन विघटितही होत नाही. शिवाय जागतिक तपमानवाढीमुळे वितळणाऱ्या पर्वतकड्यांमुळे हा सगळा कचरा उघडा पडत आहे. हवामानातील बदलांमुळे ही समस्या अधिक वाईट होत असून अधिक बेभरवशाची होत आहे.
एव्हरेस्टच्या वेगवेगळ्या तळांवर माणसांनी निर्माण केलेला कचरा फक्त खाली आणला जातो आणि खुल्या खड्ड्यात टाकला जातो. तसेच मागे राहिलेले प्लास्टिक्स आणि ऑक्सिजन सिलेंडर या परिस्थितीत आणखी भर टाकतात. त्यामुळेच गिर्यारोहकांनी आपला कचरा परत न्यावा किंवा 4,000 डॉलरचा दंड भरावा, अशी मागणी आता नेपाळ सरकारने केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी कशी करायची, हा एक प्रश्नच आहे.
सागरमाथा प्रदूषण नियंत्रण समितीच्या मते 2017 मध्ये गिर्यारोहकांनी सुमारे 25 टन कचरा आणि 15 टन मानवी मल खाली आणला. मात्र
एव्हरेस्टवर अजूनही हजारो टन कचरा बाकी आहे. एव्हरेस्टवरील चढाई आणि त्यामुळे मिळणाऱ्या जागतिक प्रसिद्धीमुळे लोकांना वेडे केले आहे. हे कौतुक व प्रसिद्धी मिळविण्यासाठी 100,000 अमेरिकन डॉलर खर्च करणाऱ्या पर्यटकांना तुलनेने मामुली असा 4,000 डॉलरचा दंड भरण्यात काय अडचण असणार आहे? ज्या लोकांना इतिहासात आपले नाव कोरण्याची इच्छा आहे त्यांच्या दृष्टीने हे प्रदूषण फारसे काळजीचे वाटत नाही.
एव्हरेस्टवरील गिर्यारोहण ही आता पूर्वीपेक्षा विकसित झाली आहे. मागील काळात त्यात असलेले गूढ आणि दुर्गमता आता राहिलेली नाही. व्यावसायिकतेने या क्षेत्राचा असा काही ताबा घेतला आहे, की निव्वळ नफ्यासाठी अनुभव, योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षितता यांच्याकडे चक्क कानाडोळा केला जातो. त्याचे हे दुष्परिणाम आहेत. एव्हरेस्टची हीच लायकी आहे का? आपण जबाबदारीने वागणार का नाही, असे प्रश्न आता पर्यावरणतज्ञ विचारत आहेत.
केवळ मौजमजेसाठी गिर्यारोहणाचा व्यवसाय 1980 च्या दशकात ऐन भरात आला. तेव्हा त्या व्यवसायाचे दुष्परिणाम सर्वांना जाणवू लागले. दरवर्षी वसंत ऋतूत पर्यटकांच्या झुंडी एव्हरेस्टवर आदळतात. शेर्पाच्या संघटना आणि सहल कंपन्या त्यांच्या प्रवासांच्या तयारीला लागतात. पुढील काही आठवडे एव्हरेस्ट बेस कॅम्प हेच त्यांचे घर बनते आणि या पर्वताच्या परिसरात लोकांची वर्दळ वाढते. या व्यवसायात जो पैसा गुंतला आहे, त्यामुळे पर्यटकांसाठी एव्हरेस्ट बंद करणे अशक्य आहे. मात्र सरत्या काळासोबत ही समस्या आणखी वाईट होत जाणार आहे.
मात्र हे प्रदूषण केवळ पर्वत क्षेत्रापर्यंत मर्यादित राहिलेले नाही.येथील मानवी मैला हा जवळपासच्या गावांमध्ये खड्ड्यात टाकला जातो. त्या घाणेरड्या खड्ड्यांमधून येणाऱ्या दुर्गंधीसोबत गावकऱ्यांना राहणे भाग पडते. पावसाळ्यात वाहत्या पाण्यासोबत हा मैला नद्यांमध्ये वाहून जातो तेव्हा परिस्थिती आणखी वाईट होते. हे असेच चालू राहिले तर या प्रदेशात महामारीचा उद्भव होण्याची शक्यता आहे.
यावर टिकाऊ धोरणात्मक उपायांसह पर्वताची स्वच्छता होण्याचीही आवश्यकता आहे.
येथील कचऱ्याची स्वच्छता करण्यासाठी काही संघटना आणि गट कार्यरत आहेत. मात्र नेपाळ सरकारला या समस्येचे गांभीर्य अद्याप समजलेले नाही. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यटकांसाठी बेस कॅम्प बंद करणार असल्याची चीनने नुकतीच घोषणा केली आहे. या घोषणेचे कठोरपणे पालन करण्याचे चीनने वचन दिले आहे. मात्र असा धाडसी निर्णय नेपाळसारखे गरीब राष्ट्र घेऊ शकेल का?
डच गिर्यारोहक विल्को व्हॅन रुइजेन याच्या म्हणण्यानुसार, “हा पर्वत (एव्हरेस्ट) आता धोका राहिलेला नाही, तर त्यावरील लोकांची संख्या हा धोका आहे.” त्याचे म्हणणे गिर्यारोहकांच्या सुरक्षेच्या संदर्भात होता, मात्र ते पर्यावरण आणि पर्वतालाही लागू होते.