चैत्र नवरात्रामध्ये साजरा होणारा राजस्थानचा खास सण – गणगौर

gangaur
चैत्र नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच चैत्रातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा होणारा ‘गणगौर’ हा उत्सव राजस्थान राज्यामध्ये विशेष महत्वाचा समजाला जातो. अविवाहित कन्यांना मनासारखा वर मिळवून देणारे आणि विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती करून देणारे हे व्रत म्हणून याचे मोठे महत्व आहे. ‘गण’ म्हणजे शिवशंकर किंवा ईश्वर, आणि ‘गौरी’ म्हणजे ‘पार्वती’. त्यामुळे या दिवशी शिव पार्वातींचे पूजन, आराधना केली जाते. पुराणांच्या अनुसार पार्वतीने मनासारखा पती मिळावा आणि तिचे सौभाग्य अटळ राहावे म्हणून कठीण तप केले. याच तपाच्या पुण्याईने पार्वतीला शिवशंकर पतीच्या रूपात प्राप्त झाले. या तपाने प्रसन्न होऊन शिवशंकरांनी केवळ पार्वतीलाच नाही तर समस्त स्त्रीवर्गाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद फळाला यावा म्हणून हे व्रत करण्याची परंपरा सुरु झाल्याचे म्हटले जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आणि अविवाहित कन्या मनोभावे शिवपर्वातींची आराधना आणि पूजन करतात.
gangaur1
गणगौरीच्या व्रतानिमित्त पूजा करण्यासाठी अविवाहित कन्या आणि विवाहित स्त्रीया पहाटे लवकर उठून, स्नान करून सुंदर वस्त्रे आणि आभूषणे परिधान करतात. त्यानंतर डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन स्त्रिया बगिच्यामध्ये जाऊन तेथून ताजी फुले, दूर्वा आणि इतर पत्री गोळा करून या पाण्याच्या कलशामध्ये भरून आणतात. कलश डोक्यावरून नेताना स्त्रिया गणगौरीची पारंपारिक गीते म्हणतात. घरी आल्यानंतर मातीचे शिवपार्वती तयार करून त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. शिवपार्वतींना सुंदर वस्त्रे अर्पण करून यथासांग पूजा केली जाते.
gangaur2
तसेच जिथे पूजा होत आहे तिथे भिंतींवर कुमकुम, मेहंदी, आणि काजळाच्या रेघा काढल्या जातात. एका थाळीमध्ये चांदीचा छल्ला, आणि सुपारी ठेऊन त्यावर पाणी, दही, दुध, हळद आणि कुमकुम एकत्र करून त्याचा अभिषेक केला जातो. याला ‘सुहाग जल’ म्हटले जाते. हा जलाचे थेंब आधी गणगौरीच्या मूर्तीवर शिंपडून मग स्त्रिया या जलाचे काही थेंब स्वतःवरही शिंपडून घेतात. पूजेच्या शेवटी चूर्मा चा नैवेद्य दाखवून देवीची कथा वाचली जाते.
gangaur3
पूजेच्या वेळी स्त्रिया गणगौरीची मंगल गीते गातात. या पूजेच्या वेळी जे कुमकुम गौरीला अर्पण केले जाते, तेच कुमकुम महिला स्वतःच्या कपाळी आणि भांगामध्ये लावतात. सायंकाळी चांगला मुहूर्त पाहून गणगौरीला जल अर्पण करून एखाद्या जलकुंडामध्ये गणगौरींचे विसर्जन केले जाते. गणगौर हे व्रत महिलांचे असल्याने या सणानिमित्त देवतांना अर्पण केला जाणारा प्रसाद पुरुषांना दिला जात नाही.

Leave a Comment