फेसबुकची शुद्धीकरण मोहीम – आवश्यक आणि स्वागतार्ह

facebook
निवडणुकीच्या काळात आपल्या व्यासपीठाचा उपयोग राजकीय फायद्यासाठी किंवा अफवा पसरविण्यासाठी होता कामा नये, यासाठी फेसबुकने सोमवारी शेकडो खाती आणि पेज काढून टाकले. फेसबुकने केलेल्या कारवाईत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा समावेश आहे. त्यातून कंपनीने निष्पक्षता बाळगल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसते. मात्र काँग्रेसशी संबंधित पानांची संख्या ही चिंतेची बाब आहे. ते काही असले तरी फेसबुकची ही शुद्धीकरण मोहीम आवश्यकही आहे आणि स्वागतार्हही!

खोट्या बातम्या आणि अपप्रचार करणाऱ्या शेकडो पेजेसवर कारवाई करून फेसबुकने एक जोरदार धक्का दिला आहे. गोंधळ निर्माण करणारे, फसवे किंवा अनुचित साहित्य आता सहन केले जाणार नाही, असा संदेश या निमित्ताने फेसबुकने आपल्या परीने दिला आहे. रशिया आणि अमेरिकेतील काही मंडळींनी सहेतूक जाहिरातींद्वारे 2016 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला होता, या आरोपावरून फेसबुकची या आधी खूपच बदनामी झाली होती. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या आधी फेसबुकला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या कऱण्यात येत होते. अशा पद्धतीचा गैरप्रकार भारताच्या निवडणुकीत होऊ नये, यासाठी म्हणूनच मार्क झुकेरबर्गच्या नेतृत्वाखालील फेसबुक डोळ्यात तेल घालून दक्ष आहे. ही स्वागत करण्यासारखीच गोष्ट आहे.

‘या कामात गुंतलेल्या लोकांनी आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित लोक असल्याचे आढळले. यातील बहुतांश खाती आमच्या स्वयंचालित प्रणालीने रद्द केली,’ असे फेसबुकच्या सायबर सिक्युरिटी पॉलिसीचे प्रमुख नाथानेल ग्लेचियर यांनी सांगितले. या खात्यांचे सुमारे दोन लाख 6000 जण फॉलोअर होते आणि ते वैयक्तिक पातळीवर चालविले जात होते, असे ग्लेचियर म्हणाले.

भाजप समर्थक ‘ द इंडिया आय’ हे पेज या कारवाईत काढून टाकण्यात आले. या पेजचे 20 लाखांहून अधिक फॉलोअर होते. भाजपच्या नमो अॅपची निर्माता कंपनी सिल्वर टचद्वारे चालवण्यात येत असलेली काही खातीही काढून टाकल्याचे कंपनीने म्हटले होते. मात्र भाजपचा किंवा पक्षाच्या मोबाईल अॅपचा या कंपनीशी संबंध नाही, असे भाजपने स्पष्ट केले. तेव्हा सिल्वर टच कंपनी नमो अपशी संबंधित असल्याचा फेसबुकला कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे फेसबुकने स्पष्ट केले.

त्यापूर्वी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसशी संबंधित 549 फेसबुक खाती आणि 138 पेजेस काढून टाकण्याची बातमी आली होती. अप्रामाणिक वर्तनामुळे अनेक खाती बंद केली असून या पेज आणि खात्यांवरून फेसबुकवर जाहिरातींसाठी सुमारे 27 लाख रुपये खर्च कऱण्यात आले, असे कंपनीने सांगितले.

भाजपचा आयटी सेल आणि एकूणच उजव्या गटाच्या मंडळींकडून खोट्या बातम्या पसरवतो, हा ‘उदारमतवादी’ पक्षांचा आवडता सिद्धांत आहे. काँग्रेस हाही उदारमतवादी पक्षच मानला जातो. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या बाजूने खोटा प्रचार करणारे एवढे पान असतील, तर काँग्रेसच्या दाव्यावर त्यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहते. अपप्रचाराद्वारे नव्हे तर निव्वळ आपल्या कामातून लोकांना आपल्याकडे खेचून आणू शकतो, हे काँग्रेसला दाखवून द्यावे लागेल. त्या दृष्टीने ही एक उत्तम संधी आहे, असे म्हणता येईल.

दुसरीकडे फेसबुकने आपले कोणतेही अधिकृत पेज काढले नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. आमच्या वास्तविक कार्यकर्त्यांनी चालविलेले पेजही हटवण्यात आलेले नाहीत. फेसबुकने काढलेल्या पेजच्या संपूर्ण यादीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, असेही पक्षाने म्हटले आहे.

या कारवाईत 103 संशयास्पद खातीही अवरोधित करण्यात आली. यामध्ये पाकिस्तानी सैन्य किंवा त्यांच्या हस्तकांच्या खात्यांचाही समावेश होता. मुक्त व निष्पक्ष निवडणुकांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरावी. खोट्या बातम्या, प्रायोजित सामग्री आणि राजकीय दिशाभूल करणारे वर्तन यांना अंकुश लावणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात तर त्याची जास्तच गरज आहे.

झुकेरबर्गच्या अखत्यारित असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही कारवाई कऱण्यात आली आहे. मात्र ही कारवाई केवळ या कंपनीच्या पातळीवरच राहता कामा नये. अशा अनैतिक वर्तनाबद्दल जाब विचारणारी एक जागरूक टीम तयार व्हायला हवी. राजकीय पक्षांनीही अशा गैरप्रकारांवर लक्ष ठेवून त्या विरोधात आवाज उठवायला हवा, अन्यथा ते स्वतःच त्याला बळी पडतील.

Leave a Comment