काही काळापूर्वी रूढ झालेली ‘डेस्टीनेशन वेडिंग’, म्हणजेच एखाद्या खास जागी विवाहसोहोळा आयोजित करण्याची पद्धत केवळ परदेशामध्येच नाही, तर भारतामध्येही अतिशय लोकप्रिय झाली आहे. या ट्रेंडच्या जोडीनेच आता आणखी एक नवा ट्रेंडही लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहे. अलीकडच्या काळामध्ये ‘वेडिंग फोटोग्राफी’ ही संकल्पना खूपच लोकप्रिय होत आहे. वेडिंग फोटोग्राफी करताना विवाहसोहोल्यातील इतर छायाचित्रांच्या जोडीनेच, नवविवाहित दाम्पत्याचे देखील एखाद्या खास ‘थीम’प्रमाणे पोशाख करून एखाद्या खास ठिकाणी हे फोटोशूट केले जाते. पण आजकाल असे वेडिंग फोटोशूट एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी न केले जाता, ते अंडर वॉटर करवून घेण्याचा नवा ट्रेंड सध्या वेगाने लोकप्रिय होत आहे. हा ट्रेंड केरळ राज्यामध्ये जास्त लोकप्रिय होत असून, आजकाल खास अंडर वॉटर वेडिंग फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफर्सना पुष्कळ मागणी आहे.
अंडरवॉटर फोटो शूटमध्ये केवळ नवविवाहित दाम्पत्यानेच सहभागी व्हायचे असून, त्यांना यासाठी आपल्या विवाहासाठी बनविला गेलेला खास पोशाख परिधान करायचा असतो. या फोटोशूटसाठी वधू-वरांना कोणत्याही प्रकारची डायव्हिंग इक्विपमेंट, ऑक्सिजन मास्क इत्यादी सामग्री सोबत नेण्याची आवश्यकता नसते. हे अंडरवॉटर फोटोशूट एखाद्या तलावामध्ये, नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये न केले जाता, स्वमिंग पूलमध्ये केले जाते. हे फोटोशूट करण्यापूर्वी वधू-वरांना काही काळ आधीच स्विमिंग पूलमध्ये उतरवून पाण्याखाली श्वास रोखून धरण्याचा सराव करविला जातो. पाण्याखाली काही सेकंद श्वास रोखून धरण्याचा पुरेसा सराव वधू-वरांना झाला, की मग फोटोग्राफीला सुरुवात होते.
अशा प्रकारच्या अंडर वॉटर फोटोग्राफीसाठी कोणत्याही प्रकारच्या खास कॅमेराची आवश्यकता नसते. सर्वसामान्य ‘डीएसएलआर’ कॅमेराच्या मार्फतही ही छायाचित्रे उत्तम प्रकारे घेतली जाऊ शकतात. अशा प्रकारच्या फोटोग्राफीसाठी खास वॉटर प्रुफ किट्स बाजारामध्ये उपलब्ध असतात, त्यांचा वापर ही फोटोग्राफी करताना केला जात असतो. कॅमेरा पाण्यापासून सुरक्षित ठेवण्याकरिता कॅमेरा आणि त्याच्या लेन्सेसना खास वॉटर प्रुफ कव्हर्स घालण्यात येतात. अशा प्रकारच्या चांगल्या वॉटर प्रुफ किट्सची किंमत साधारण एक ते दीड लाख रुपयांपर्यंत असते. हे फोटोशूट करविताना वधू-वरांचे किंमती पोशाख खराब होऊ नयेत यासाठी खास अशा प्रकारच्या अंडर वॉटर फोटोशूटसाठी वधू-वरांचे पोशाख ठराविक भाडे देऊन उपलब्ध करविले जातात. या फोटोशूटच्या वेळी लाईफ गार्डस उपस्थित असतील याची खबरदारी घेतली जाते. अशा प्रकारे पाण्यामध्ये उतरलेल्या नवविवाहित दाम्पत्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका उद्भविणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन हे फोटोशूट केले जाते.