उन्हाळ्यामध्ये चाखून पहा थंड आणि पौष्टिक नाचणीचे आंबील

ambil
रागी किंवा नाचणी हे तृणधान्य दक्षिण भारतामध्ये विशेष प्रचलित आहे. नाचणी शरीराला थंडावा देणारी असल्याने उन्हाळ्यामध्ये नाचणीची भाकरी, किंवा आंबील हे पदार्थ आवर्जून खाल्ले जाण्याचा सल्ला आहारतज्ञ देत असतात. नाचणीमध्ये कॅल्शियम, जीवनसत्वे, आणि लोह मुबलक मात्रेमध्ये आहेत. तसेच यामध्ये साखरेचे प्रमाण नगण्य असून, फायबरची मात्रा भरपूर आहे. त्यामुळे ज्यांना वजन घटवायचे आहे त्यांनी या धान्याचा समावेश आपल्या आहारामध्ये अवश्य करावा. ज्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे त्यांनीही नाचणीचे सेवन करावे. नाचणी शरीरातील रक्त वाढविणारी आहे. शंभर ग्राम नाचणी मध्ये ३४४ मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे ज्यांची हाडे कमकुवत आहेत त्यांच्यासाठी आणि वाढत्या वयाच्या लहान मुलांसाठी नाचणी अतिशय चांगली आहे.
ambil1
नाचणीच्या नियमित सेवनाने शरीराला आवश्यक ती जीवनसत्वे मिळत असल्याने त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य चांगले राहते. नाचणी ड जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहे. त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये या जीवनसत्वाची कमतरता असेल, त्यांनी नाचणीचा समावेश आपल्या आहारामध्ये अवश्य करावयास हवा. नाचणीची भाकरी करून खाता येते किंवा नाचणी अंकुरित करून( मोड आणून)ही खाल्ली जाऊ शकते. नाचणी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात नाचणीचे आंबील नेमाने सेवन करावे. यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच, शिवाय आवश्यक पोषणही मिळते. नाचणीचे आंबील हा पदार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये प्रचलित आहे. केरळमध्ये नाचणीच्या सत्वामध्ये दुध, साखर, किंवा कंडेन्स्ड मिल्क, वेलची पूड, घालून गोड पेय तयार करण्याची पद्धत आहे.
ambil2
नाचणीचे आंबील बनविण्यासाठी फार मेहनतीची आवश्यकता नाही. अगदी काहीच मिनिटांमध्ये झटपट तयार होणारे हे चविष्ट आणि पौष्टिक पेय आहे. यासाठी दोन चमचे नाचणीचे पीठ, ५०० मिलीलीटर ताक, अर्धा चमचा जिरे पूड, दोन लसणीच्या पाकळ्या, अर्धी हिरवी मिरची, थोडी चिरलेली कोथिंबीर, आवडत असल्यास थोडासा पुदिना, चवीला थोडे काळे मीठ आणि पाणी, इतक्या साहित्याची आवश्यकता असते. आंबील बनविण्याकरिता लसूण आणि मिरची बारीक ठेचून घ्यावी. नाचणीच्या पीठामध्ये थोडेसे पाणी घालून हे पीठ कालवून घ्यावे. पीठ फार पातळ असू नये. एका भांड्यामध्ये दोन कप पाणी उकळून घेऊन त्यामध्ये ठेचेलेले लसूण, मिरची आणि काळे मीठ, जिरे पूड घालावी. पाण्यात कालविलेले नाचणीचे पीठ उकळत्या पाण्यामध्ये घालून हे पाणी सतत ढवळावे. सतत ढवळल्याने पीठामध्ये गाठी होत नाहीत. हे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यावे. नाचणीचे पीठ शिजण्यास जास्त वेळ लागत नाही. पीठ शिजल्यावर आच बंद करावी आणि पीठ थंड होऊ ध्यावे. पीठ थंड होतानाही अधून मधून ढवळत राहावे, जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत. पीठ थंड झाल्यावर यामध्ये थंड ताक घालून मिसळावे. हे मिश्रण एकजीव झाल्यावर यामध्ये कोथिंबीर, पुदिना आणि आवडत असल्यास पाव चमचा किसलेले आले घालावे. जर मिश्रण दाट वाटत असेल तर जितपत पातळ हवे असेल तेवढे पाणी घालावे. आवश्यकता असल्यास मीठ घालून हे आंबील पिण्यास द्यावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment