माकप, राहुल, पप्पू आणि वायनाड…!

rahul-gandhi
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केला. त्यांच्या या निर्णयामुळे केरळमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. त्यांनी मिठाई वाटली, फटाके फोडले आणि राहुल गांधी यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतच त्यांच्या सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही या निमित्ताने आनंद व्यक्त केला, असे केरळमधून आलेल्या बातम्यांमध्ये दिसते.

मात्र राहुल यांचा हा निर्णय डाव्या पक्षांना अजिबात रूचलेला नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) ‘देशाभिमानी’ या वृत्तपत्राने तर यानिमित्ताने कहरच केला आहे. या वृत्तपत्राच्या मंगळवारच्या अंकात जे संपादकीय छापून आले आहे, त्यात राहुल गांधी यांचा उल्लेख चक्क पप्पू म्हणून केला आहे. कोंग्रस्‌ तकरच्च पूरणमाक्कान पप्पु स्ट्रैक्क (काँग्रेसचा विध्वंस पूर्ण करणारा पप्पू स्ट्राईक) असा मथळा दिलेला हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीशिवाय वायनाडमध्येही लढण्याचा निर्णय घेतला आहे. आई आणि आजीप्रमाणेच दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी राहुल हे आता सज्ज झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. गांधी कुटुंबियांचा गड असलेल्या अमेठीत पराजयाची भीती वाटत असल्यामुळेच राहुल गांधी यांनी वायनाडकडे आपला मोर्चा वळविला आहे, यात काही संशय नाही. 1980च्या निवडणुकीत संजय गांधींनी विजय मिळविल्यानंतर एक अपवाद (1998–-99) वगळता काँग्रेसने सदैव विजय मिळविलेला मतदारसंघ म्हणजे अमेठी. तरीही गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल यांचे मताधिक्य दोन लाखांनी कमी झाले. इतकेच नव्हे, तर 2017 मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघात मोडत असलेल्या पाचही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराजय झाला. नेहरू कुटुंबाचा वारसदार पराभूत झाल्यास मान खाली जाईल. तसेच निवडणूक लढून जिंकण्यासाठी उत्तर भारतात हीच एक जागा काँग्रेससाठी आहे, हेही खरे आहे. म्हणूनच राहुल गांधी दक्षिण भारतात आले आहेत, असे या संपादकीयात म्हटले आहे.

अर्थात या संपादकीयावरून चर्चेला तोंड फुटले. त्यानंतर माकपने आपली चूक झाल्याचे सांगत या वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला. ही माकपची पद्धत नाही आणि ही अनवधानाने झालेली चूक आहे, असे राज्याचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी म्हटले आहे. परंतु पक्षाचे काही नेते अजूनही मागे हटायला तयार नाहीत. ज्येष्ठ माकप नेते व्ही. एस. अच्युतानंद यांनी राहुल हे बालिश वर्तन करत आहेत आणि परिस्थितीचे गांभीर्य त्यांना समजत नाही, असे म्हटले आहे. “वायनाडमधून राहुलनी निवडणूक लढल्याने काय फरक पडणार आहे? डावे पक्ष काँग्रेस आणि भाजपचा एकत्रितरीत्या सामना करतील? पण काँग्रेसचे काय? भारतीय जनता पक्ष हा आमचा मुख्य शत्रू आहे, ही त्यांची भूमिका यामुळे उद्ध्वस्त होईल,” असे त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून म्हटले.

पप्पू हा शब्द सोशल मीडियावर राहुल यांच्याबाबत हेटाळणीने वापरला जातो. मुख्यतः भाजपच्या गोटातून या शब्दाचा वापर होतो. मात्र 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने भाजपला या शब्दाचा वापर करण्यापासून रोखले होते.

प्रश्न हा आहे, की एका वायनाडच्या जागेवरून डावे पक्ष काँग्रेसवर इतके का उखडले आहेत? वायनाडमध्ये त्यांचा जीव इतका का गुंतला आहे?
केरळ आणि पश्चिम बंगाल हे साम्यवादी पक्षांचे गड मानले जात होते. त्यातील प. बंगालमधील गड ममता बॅनर्जींनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केला. म्हणजेच डावे पक्ष उरले ते केवळ केरळपुरते. राज्यात लोकसभेच्या एकूण 20 जागा आहेत. राज्यात माकप आणि भाकप (भारतीय साम्यवादी पक्ष) तसेच अन्य पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे या आघाडीला राज्यात बहुतांश जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. खुद्द राहुल यांची वायनाड ही जागा त्या बहुतांश जागांमध्ये नसेलही, परंतु राहुल यांनी केरळमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचरेल आणि डाव्या आघाडीपुढे आव्हान उभे राहील. पहिल्या परिच्छेदात वर्णन केलेल्या फटाके फोडणे, जयजयकाराच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यांचे महत्त्व त्यातून समजू शकेल.

उद्या समजा भाजपचा पराभव झाला, सरकार स्थापनेसाठी लोकसभेत जागा कमी पडल्या आणि आघाडी सरकार बनविण्याची वेळ आली, तर सौदेबाजी करण्यापुरते तरी आपले बळ असावे, ही प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. माकपच्या या इच्छेलाच जर राहुल खोडा घालणार असतील, तर राहुल त्यांच्या दृष्टीने पप्पू ठरणारच.

Leave a Comment