चौकीदार? नव्हे व्यापार!

chowkidar2
यंदाच्या निवडणुकीत चौकीदार हा शब्द चर्चेत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘चौकीदार चौकन्ना है’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर आहे’ ही मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहे. या दोन मांजरांमध्ये सत्तेच्या लोण्यावरून भांडण होत आहे तर दुसरीकडे व्यापाऱ्यांना मात्र प्रचंड फायदा होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकीच्या साहित्याद्वारे मतदारांपर्यंत पोचण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावरील प्रचारापासून ते कार्यकर्त्यांच्या टी शर्टपर्यंत ब्रँडिंग करण्याचे काम व्यावसायिक पातळीवर केले जात आहे. मात्र यात भारतीय जनता पक्षाने जबरदस्त आघाडी घेतली असून त्यासाठी चौकीदार हा शब्द त्यांच्या पथ्यावर पडला आहे. हे शब्द असलेले टी-शर्ट बाजारात मोठ्या प्रमाणात खपत असून त्यामुळे व्यापाऱ्यांची चांदी होत आहे.
छोटे दुकानदार असोत किंवा मोठे व्यावसायिक, ते या चौकीदार घोषणा असलेल्या हजारो टी-शर्ट आणि टोप्या विकून दररोज कोट्यवधींची कमाई करत आहेत. इतकेच कशाला फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या संकेतस्थळांवरूनही या वस्तूंची विक्री होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हे राजकीय भांडण म्हणजे फायद्याचा सौदा ठरला आहे.
chowkidar
अॅमेझॉन, पेटीएम, नमो इंडिया आणि फ्लिपकार्ट अशा वेबसाईटवर हे टी-शर्ट आणि टोप्या 150रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत विकण्यात येत आहेत. हे टी-शर्ट आणि टोप्या वेगाने लोकप्रियही झाले आहेत. केवळ टी-शर्ट आणि टोप्याच नव्हे तर मोदी मास्क, स्टीकर्स, मग, वह्या, पेन, पुस्तके आणि कीचेनसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चौकीदारसोबतच नमो अगेन, आय सपोर्ट नमो इत्यादी घोषणांचे टी-शर्टही विकले जात आहेत.

एक-एक व्यापारी दररोज 150 ते 200 टी-शर्ट विकत असल्याचे माध्यमांमधील बातम्यांवरून दिसते. निवडणुका संपेपर्यंत दीड महिन्यात सुमारे 1000 कोटी रुपयांचे चौकीदार टी-शर्ट विकले जातील, असा एक अंदाज आहे. एका टी-शर्टची किंमत 250 रुपये गृहित धरल्यास सुमारे 40 कोटी टी-शर्टची विक्री होईल, दि क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीएमएआय) म्हणणे आहे. केवळ तीन महिन्यांत नरेंद्र मोदी ब्रँडच्या 5 कोटी रुपयांच्या वस्तू विकण्यात आल्या होत्या, असे जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार सांगण्यात आले होते. ही विक्री नमो अॅपच्या माध्यमातून झाली होती. त्या व्यतिरिक्त या वस्तूंनी किती धंदा केला असावा, याची कल्पना त्यावरून करता येऊ शकते.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात (16 मार्च) या वस्तूंच्या विक्रीला सुरूवात केली होती. त्यांनी ट्विटरवरून या वस्तू विकत घेण्यासाठी लिंकही दिली होती. त्यामुळे ते राजकीय नेते नसून विक्रेते असल्याची टीका ट्विटरवरील अनेक वापरकर्त्यांनी केली होती. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही या विषयावरून मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. टी-शर्ट विकण्याऐवजी त्यांनी देशातील लोकांच्या दुःखाकडे लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या. मात्र या टीकेला दाद न देता त्यांनी ही मोहीम चालू ठेवली आणि त्याला फळ येत आहे.
chowkidar1
भाजपचे दिल्ली प्रदेश प्रवक्ते ताजिंदरपालसिंह बग्गा यांनी2014 मध्ये सर्वात आधी मोदींना समोर ठेवून चहावाला मोहीम सुरू केली होती. त्यांनीही टी-शर्ट वाटपाला सुरूवात केली आहे. “राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना चौकीदार चोर है असा टोमणा मारला, तेव्हा मी स्वतः मोदींची छायाचित्रे असलेले टी-शर्ट तयार केले. ते मी सोसायटी, मॉल, रुग्णालय अशा ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना देतो,” असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी स्वतः टीशर्टभैया डॉट कॉम नावाचे संकेतस्थळ काढून त्यावरून या टी-शर्टची विक्री सुरू केली आहे. मोदी यांनी विक्री सुरू करण्यापूर्वीच त्यांना 100-150 टी-शर्टचे ऑर्डर मिळत होते. हा आकडा आता 2500 पर्यंत गेला आहे.

गंमत म्हणजे या व्यावसायिकीकरणात काँग्रेसही मागे नाही. ‘चौकीदार चोर है’ असे लिहिलेले काळे टी-शर्टही बाजारात उपलब्ध आहेत. असे टी-शर्ट घालून काँग्रेस कार्यकर्त्यांनी नुकतीच उत्तर प्रदेशात निदर्शने केली. एकंदरीत पाहता 2019 मधील अटीतटीच्या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी देशातील किमान एक वर्ग आनंदी होणार, हे निश्चित आहे.

Leave a Comment