पुणे ग्रामीण पोलिसांनी जप्त केला शस्त्रास्त्र, स्फोटकांचा मोठा साठा

pune
पुणे – पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील पिंपळवाडी येथील एका व्यक्तीकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) संयुक्त पथकाने केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव राजाराम किसन अभंग (वय ६०, रा. अभंगवस्ती, पिंपळवाडी) असे असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. बॉम्बस्फोट घडवून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न त्याने यापूर्वी केला होता. जुन्नर तालुक्यात बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना पिंपळवाडी येथील राजाराम अभंग याच्याकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली होती. अभंग याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना इलेक्ट्रिक गन, पाईप बॉम्ब, तलवार, कोयता, भाले, बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रिक उपकरणे आदी स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभंग हा असून यापूर्वी २००३ साली त्याने त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात काही लोक जखमी झाले होते. तो याप्रकरणी तीन वर्षे येरवडा कारागृहात कैदेत होता. अभंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करत आहेत.

Leave a Comment