प्रचारात होत आहे नाना पाटेकर यांच्या फोटोचा गैरवापर

nana-patekar
मुंबई – देशभरातील राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले आहे. निवडणुकीसाठी सभा, बैठकी, दौरे, भाषणांमधून प्रचार सुरु झाला असून प्रत्यक्ष गाठीभेटींसोबतच यंदा ऑनलाईन प्रचार देखील जोमात असल्याचे दिसत आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक अनेक मेसेजेस आणि पोस्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण याच दरम्यान अनेक मेसेज अभिनेता नाना पाटेकर यांच्या नावानेही व्हायरल होताना दिसत आहे. पण खुद्द नानांनीच यासंदर्भात ट्विट करुन कोणत्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नसून कोणत्याही उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केला नसल्याचे म्हटले आहे.

सध्या नानांच्या नावाने अनेक फोटो व्हायरल होत असून त्यांनी यामध्ये अमूक एका पक्षाला किंवा उमेदवाराला समर्थन दिले आहे अशा आक्षयाचा मजकूर असतो. पण खुद्द नानांनीच ट्विट करुन या फोटोंमागील सत्य सांगितले आहे. नाना आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आम्ही गावोगावी नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. अशा फोटोंचा काही मंडळी गैरवापर करीत आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला मी पाठिंबा दिलेला नाही.


या आधीही अनेकदा नाना पाटेकर यांनी व्हॉटस्अपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजेसबद्दलही आपला त्या मेसेजसची काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते. प्रभावशाली व्यक्तींचे फोटो आणि त्याबरोबर चुकीची माहिती निवडणुकांच्या काळामध्ये अनेकदा व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवरुन व्हायरल होते. ही माध्यमे अनेकदा नव्याने वापरणाऱ्यांना ही माहिती खरी वाटते. त्यामुळेच नानांनी हे ट्विट करुन असला खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment