सामान आणलेल्या प्लास्टिक बॅग फेकू नका, पिऊन टाका

plastic
जगातील बहुतेक सर्व माणसे रोज काही न काही प्रकारची खरेदी करतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. जगभरात प्लास्टिक कचरा ही मोठी समस्या आहे आणि अनेक देशांनी प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे तरीही खरेदी केली कि पोलीथीनच्या बॅग दिल्या जातातच. एकंदरीत प्लास्टिकचा वापर बंद होणे ही अशक्यप्राय गोष्ट बनली आहे. त्यामुळे प्लास्टिक तर राहील पण त्याचा कचरा होणार नाही यासाठी जगभरात संशोधन केले जात आहे. इंडोनेशियातील अवनी या संस्थेने यावर नामी उपाय शोधला आहे. त्यांनी पाण्यात पूर्णपणे विरघळतील आणि हे पाणी पिऊन टाकले तरी शरीराला कोणताही अपाय होणार नाही अश्या प्लास्टिक बॅग तयार केल्या आहेत.

soluble
या प्लास्टिक पिशव्या पूर्णपणे बायोडीग्रेडेबल आहेत. वापरून झाल्यावर त्या गरम पाण्यात टाकल्या कि पूर्णपणे विरघळतात. हे पाणी पिता येते तसेच झाडांना घालता येते. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या पिशव्या कसावाच्या मुळापासून बनविल्या गेल्या आहेत. अवनी संस्थेचे संस्थापक केविन कुमार म्हणाले या पिशव्या नैसर्गिक पदार्थापासून बनविल्या गेल्या आहेत. आणि या पिशव्या माणसाच्या किंवा प्राण्यांच्या पोटात गेल्या किंवा झाडांना पाणी म्हणून वापरल्या तरी त्यापासून कोणताही अपाय होत नाही याच्या अनेक चाचण्या घेतल्या गेल्या आहेत.

पिशव्या विरघळून केलेले पाणी पोटात गेले तरी पोटातील द्रव पदार्थात ते सहज मिसळून जाते. आणि नेहमीच्या सध्या पाण्याप्रमाणेच ते शरीरात काम करते. अवनी संस्थेने या प्रमाणे नैसर्गिक पदार्थांचा वापर करून आणखीही काही वस्तू बनविल्या आहेत. त्यात ग्लास, स्ट्रॉ, बॅग्स यांचा समावेश आहे. या मुळे जग व्यापून राहिलेल्या प्लास्टिक कचऱ्यावर तोडगा निघू शकेल अशी आशा आहे.

Leave a Comment