अनेकदा शारीरिक विश्रांती जर पुरेशी मिळत नसली, तर डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे दिसून येतात. मात्र केवळ शारीरिक थकवा आल्यानेच डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे येतात असे नाही, तर यासाठी इतरही अनेक कारणे असू शकतात. काहींच्या डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे ‘पिग्मेंटेशन’ मुळे असू शकतात. हे पिग्मेंटेशन काहींच्या बाबतीत आनुवांशिक असू शकते. दक्षिण आशियायी लोकांमध्ये अशा प्रकारचे पिग्मेंटेशन दिसून येते. पिग्मेंटेशनमुळे जर डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे असतील, तर कितीही उपाय-उपचार केले तरी ही वर्तुळे हलकी होतात, पण नाहीशी होत नाहीत.
ज्या व्यक्तींना चेहऱ्यावरील त्वचेवर सोरायसिस किंवा एक्झिमा सारखे त्वचा विकार असतील, त्यांच्याही डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे दिसून येऊ शकतात. या दोन्ही विकारांमध्ये त्वचा लालसर, किंवा गडद रंगाची दिसू लागते. तसेच सतत खाज सुटत असल्याने ही त्वचा आणखीनच काळसर दिसू लागते. त्यामुळे जर डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर एक्झिमा किंवा सोरायसिस असले, तर त्यामुळे डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे असल्याप्रमाणे भासतात. ज्या व्यक्तींना सतत डोळे चोळण्याची सवय असते, त्यांच्या डोळ्याच्या आसपासची त्वचा वारंवार चोळली गेल्यामुळे काळसर आणि काहीशी जाडसर दिसू लागते. वारंवार डोळे चोळल्याने डोळ्यांच्या आसपासची त्वचा रगडली जाते. त्यामुळे त्वचेच्या खाली असलेल्या रक्तपेशींना नुकसान पोहोचते आणि त्यामुळे त्वचा काळसर दिसू लागते.
अनेकदा डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे एखाद्या अॅलर्जीमुळेही असू शकतात. या वर्तुळांच्या जोडीनेच डोळ्यांच्या आसपास हलकी सूजही दिसून येते. त्यामुळे याचे निदान डॉक्टरांकडून करवून घेऊन योग्य औषधोपचार आणि भरपूर विश्रांतीनंतर ही काळी वर्तुळे नाहीशी होतात. शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास, म्हणजेच डीहायड्रेशन झाल्यासही डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे दिसून येतात. एखाद्या आजारपणामुळे किंवा अतिरिक्त मद्यपानामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स कमी होऊ लागतात, त्यामुळे डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे उद्भवितात. अशा वेळी पाण्याचे प्रमाण वाढविल्याने कालांतराने ही समस्या दूर होऊ शकते.
डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे असण्यामागे असू शकतात ही कारणे
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही