कथा राणी व्हिक्टोरिया आणि अब्दुलची

queen
अब्दुल करीम, ब्रिटनची पूर्वसम्राज्ञी राणी व्हिक्टोरियाला उर्दू भाषेची शिकवण देत असे, तत्कलीन भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असल्याने या प्रांताशी संबंधित अनेक विषयांवर राणीला सल्लेही देत असे, इतकेच नव्हे, तर भारतीय खाद्यसंस्कृतीशी राणी व्हिक्टोरियाचा परिचय करवून देण्याचे श्रेयही अब्दुललाच आहे. किंबहुना अब्दुल हा राणीच्या शाही आणि खासगी जीवनातील अतिशय जवळचा, विश्वासू मित्र होता असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही. अब्दुल राणी व्हिक्टोरियाचा अतिशय जवळचा ‘मुन्शी’, म्हणजेच कारभारी असला, तरी ब्रिटीश राजदरबारातील मानकऱ्यांना मात्र अब्दुलबद्दल जरादेखील आत्मीयता नव्हती. किंबहुना राणीचा अब्दुलवर असलेला विश्वास आणि त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अनेकांना खटकत असत, कारण कितीही नाही म्हटले तरी व्हिक्टोरिया ग्रेट ब्रिटनची अभिषिक्त सम्राज्ञी होती, आणि अब्दुल मूळचा भारतीय असणारा, साधा चाकर होता. पण राणी व्हिक्टोरियाला मात्र, तिच्या दरबारी मानकऱ्यांना काय वाटते याची मुळीच पर्वा नव्हती, आणि म्हणूनच तिच्या दृष्टीने एक गुरु, एक जवळचा विश्वासू मित्र आणि सल्लागार म्हणून अब्दुलचे महत्व मोठे होते.
queen1
१९०१ साली जेव्हा राणी व्हिक्टोरियाचे निधन झाले, तेव्हा तिचे पुत्र किंग एडवर्ड (सातवे) यांनी विना विलंब अब्दुलची रवानगी भारतामध्ये केली. इतकेच नाही, तर राणी व्हिक्टोरिया आणि अब्दुलमध्ये झालेले पत्रव्यवहार, इतर लेखी दस्तऐवज यांची ताबडतोब विल्हेवाट लावण्यात आली. अशा प्रकारे ब्रिटीश इतिहासामधून अब्दुलचे अस्तित्वच नाहीसे करण्यात आले. त्यानंतर सुमारे शंभर वर्षांपर्यंत अशी कोणी व्यक्ती ब्रिटीश राजवंशाच्या इतिहासामध्ये कधी अस्तित्वात होती याचा कोणताच उल्लेख कधीच पहावयास मिळाला नाही. १९९० साली इतिहासकार आणि पत्रकार असलेल्या श्राबणी बसू, ‘राणी व्हिक्टोरिया आणि भारतीय खाद्यसंस्कृतीशी तिचे नाते’ या विषयावर रिसर्च करीत असताना राणी व्हिक्टोरियाच्या ‘समर हाऊस’मध्ये श्राबणीला अब्दुलचे एक पेंटिंग सापडले. हे पेंटिंग कोणाचे असावे हे जाणून घेण्याच्या कुतूहलापोटी श्राबणीने अधिक अभ्यास केला असता, अब्दुल करीम पुन्हा एकदा अस्तित्वात आला. अब्दुल आणि राणी व्हिक्टोरियाचे नातेसंबंध दर्शविणारे श्राबणीचे ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ हे पुस्तक २०१० साली प्रकाशित झाले, आणि याच पुस्तकावर आधारित, स्टीफन फ्रेअर्स दिग्दर्शित याच नावाचा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला. यामध्ये राणी व्हिक्टोरियाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्युडी डेंच यांनी साकारली असून, अब्दुलची भूमिका अली फझलने साकरली आहे.
queen2
उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये जन्मलेला अब्दुल १८८७ साली लंडनमधील विंडसर कासल या शाही निवासस्थानी ‘भारतातर्फे सप्रेम भेट’ म्हणून आला. त्याकाळी ब्रिटीश अधिपत्याखाली असलेल्या भारतीय राज्यकर्त्यांना योग्य निर्देश देण्याच्या कमी मदत करण्यासाठी अब्दुलला भारतातून बोलाविले गेले होते. लवकरच अब्दुलने राणीची मर्जी संपादन करून घेतली. श्राबणीच्या पुस्तकातील कथेनुसार अब्दुल हा एका मुस्लीम अभ्यासकाचा मुलगा असून, त्याने त्याच्या पित्याकडून उर्दू आणि पर्शियन भाषा शिकून घेतल्या होत्या. त्यानंतर अब्दुल आग्रा जेलमध्ये कारकून म्हणून काम करीत असताना राणी एलिझाबेथच्या सेवेमध्ये रुजू होण्यासाठी त्याची लंडनला पाठवणी करण्यात आली. सुरुवातीला अब्दुल राणीला तिच्या दैनंदिन कामांमध्ये मदत करीत असे, पण लवकरच राणीचा विश्वासू म्हणून त्याचा लौकिक वाढू लागला. इतकेच नव्हे, तर राणी औपाचारिक कार्यक्रमांमध्येही अब्दुलला सह्भागी करून घेऊ लागली.
queen3
राणी व्हिक्टोरियाचा अब्दुल वरील विश्वास, ती त्याला देत असलेला सम्मान, त्यांच्यामधील आपुलकीचे संबंध राजदरबारातील इतर मानकऱ्यांना खटकू लागले. यावरून खुद्द राणी आणि शाही परिवारातील इतर सदस्यांमध्ये वाद होऊ लागले. पण तरीही राणीने शेवटच्या श्वासापर्यंत अब्दुलला अंतर दिले नाही. मात्र १९०१ साली राणीच्या मृत्यूनंतर राणीच्या मुलांनी अब्दुलची रवानगी पुनश्च भारतामध्ये करण्यात अजिबात वेळ दवडला नाही. याची कुठेही चर्चा न होऊ देण्याची पुरेपूर काळजी घेत, सैनिकांच्या सुरक्षिततेमध्ये अब्दुलची रवानगी बिनबोभाट आग्र्याला करण्यात आली. अब्दुलने आपले उर्वरित आयुष्य आग्र्यामध्ये व्यतीत केले. १९०९ साली वयाच्या ४६व्या वर्षी त्याचा अंत झाला. अब्दुलच्या आठवणी जगाला राहिल्या नसल्या, तरी त्याच्या वंशजांनी मात्र त्या आजही पुरेपूर जपल्या आहेत.

Leave a Comment