काऊलून ‘वॉल्ड सिटी’ हे लहानसे क्षेत्र हॉंगकॉंगमधील काऊलून शहरामध्ये होते. हे क्षेत्र केवळ ६.४ एकर जागेमध्ये विस्तारलेले असले, तरी या क्षेत्राची जनसंख्या पन्नास हजाराहूनही अधिक होती. एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या गगनचुंबी इमारती आणि येथे असलेले गुन्हेगारी साम्राज्य यासाठी काऊलून ‘वॉल्ड सिटी’ ओळखली जाते. ही वॉल्ड सिटी, म्हणजे वास्तविक एक लहानसा किल्ला म्हणून अस्तित्वात आली. ९६०-१२७९ या काळामध्ये सॉंग राजवंशाच्या राज्यकर्त्यांनी हा किल्ला बनवविला होता. मात्र त्यानंतर हा किल्ला अनेक वर्षे ओसाड पडून राहिल्यानंतर क़िन्ग राजवंशाच्या राज्यकर्त्यांनी ब्रिटीश सैन्यावर नजर ठेवण्याकरिता येथे एक मिलिटरी आऊटपोस्ट बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १८४७ साली या किल्ल्याची डागडुजी करून त्याच्याभोवती मोठी संरक्षक भिंत उभारण्यात आली. क़िन्ग राजवंश संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. १९१५ सालच्या सुमारास हा परिसर ‘चायनीज टाऊन’ म्हणून ओळखला जाऊ लागला.१९४० सालाच्या सुमारास हॉंगकॉंग सरकारने हा परिसर आपल्या ताब्यात घेऊन येथे स्थायिक झालेल्या लोकांना बाहेर काढले आणि येथील जुन्या इमारती थोड्याफार प्रमाणात नष्ट करविल्या.
दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी जपानने या क्षेत्रावर ताबा मिळविला आणि या किल्ल्याभोवती असलेली भिंत मोडून काढण्यात आली. १९४५ साली जपानने युद्धामध्ये हार पत्करल्यानंतर अनेक नागरिक काऊलूनमध्ये पुन्हा येऊन स्थायिक होऊ लागले. या ठिकाणी कोणाचेच शासन राहिले नसल्यामुळे, कोणतीही कायदेव्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी येऊन राहणाऱ्यांची संख्या पाहता पाहता वाढली. इतक्या लोकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे ज्या इमारती आधीपासून अस्तित्वात होत्या त्याच इमारतींवर मजल्यांवर मजले चढविले जाऊ लागले. पाहता पाहता या ठिकाणी तीनशे हूनही अधिक इमारती उभ्या राहिल्या. या इमारती इतक्या जवळजवळ होत्या, की एका इमारतीमधून दुसऱ्या इमारतीमध्ये सहज शिरता येऊ शके, इतकेच नाही, तर रस्त्यावर उतरून न येता देखील या इमारतींमधून वरच्यावरच काऊलूनच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये पोहोचता येत असे. तसेच जशी आणि जिथे जागा मिळेल तशा या इमारती वाढविल्या आल्याने इमारतीच्या अनेक भागांमध्ये सूर्यप्रकाशही पोहचत नसे.
इतके सगळे घडत असतानाही सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न केला गेल्याने १९५० सालापासून काऊलून वॉल्ड सिटीमध्ये गुन्हेगारी साम्राज्याला सुरुवात झाली. या ठिकाणी अनेक गुन्हेगारांचे अड्डे, अंमली पदार्थांचे व्यवसाय, वेश्याव्यवसाय, जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरु झाले. १९७० च्या दशकामध्ये मात्र अखेर सरकारने काऊलून वॉल्ड सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारण्यास सुरुवात केली. १९८० च्या दशकामध्ये ब्रिटीश आणि चीन सरकारने काऊलून वॉल्ड सिटी हे नागरिकांनी राहण्यास असुरक्षित आणि अयोग्य असल्याचे ठरवून येथील इमारती पाडून टाकण्याचा निर्णय घेतला. येथे राहणाऱ्या नागरिकांना ही जागा सोडून दुसरीकडे स्थायिक होण्यासाठी आर्थिक मदतही देण्यात आली. अखेरीस १९९३ साली काऊलून वॉल्ड सिटी संपूर्णपणे जमीनदोस्त करून या ठिकाणी अतिशय सुंदर उद्यान उभारण्यात आले. हेच उद्यान आताच्या काळामध्ये काऊलून वॉल्ड सिटी पार्क म्हणून प्रसिद्ध आहे.