आपल्या व्यायामामध्ये अवश्य समाविष्ट करा या योगमुद्रा

mudra
आपल्या दिनचर्येमध्ये व्यायाम हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे समाविष्ट असतो. कोणी चालायला जाणे पसंत करतात, तर धावणे, पोहोणे, सायकलिंग, एखादा खेळ खेळणे, योग असे अनेक व्यायामाचे प्रकारही लोकप्रिय आहेत. या सर्व व्यायामांच्या सोबतीनेच योगसाधनेमध्ये सांगितलेल्या काही मुद्रा आपण आपल्या व्यायामामध्ये समाविष्ट केल्या, तर त्याचे निश्चित लाभ आपल्याला होतात. या मुद्रा लाभदायक आहेतच, शिवाय करण्यास अतिशय सोप्या, कुठेही आणि केव्हाही करता येण्यासारख्या आहेत. या मुद्रा करण्यासाठी कोणत्याही साधन सामग्रीची आवश्यकता नाही. घरामध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी, किंवा इतरत्र कुठेही आपल्याजवळ थोडासा मोकळा वेळ असेल तेव्हा या मुद्रा करता येऊ शकतील.
mudra1
योगसाधनेमध्ये अनेक मुद्रा सांगितल्या गेल्या आहेत. प्रत्येक मुद्रेचा शरीराच्या विशिष्ट अवयवांवर थेट परिणाम होत असतो. यापैकी कोणतीही मुद्रा करताना ती पंधरा मिनिटांसाठी करावी. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर ठेवण्याला ‘भैरव मुद्रा’ म्हटलेले आहे. ध्यान करीत असताना ही मुद्रा केली जाते. या मुद्रेमुळे मेंदूच्या दोन्ही ‘हेमिस्फियर’मध्ये संतुलन राहते. ही मुद्रा हृद्य, पोट, यकृत, गॉल ब्लॅडर, प्लीहा, पॅन्क्रिया, आणि किडनीच्या आरोग्याकरिता उत्तम मानली जाते. हाताची करांगुली आणि अंगठा वाकवून यांची टोके टोके एकमेकांना जुळवून केलेलीमुद्रा ‘वरूण मुद्रा’ म्हणून ओळखली जाते.चेहऱ्यावर तेज आणून चेहऱ्यावर वारंवार मुरूम पुटकुळ्या येत असल्यास ते कमी करणारी, अंगाला खाज सुटत असल्यास ती दूर करणारी, आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करणारी अशी ही मुद्रा आहे. हाताचा अंगठा, तर्जनी आणि मध्यमीची टोके जुळवून ‘कुबेर मुद्रा’ केली जाते. ही मुद्रा एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविणारी, तसेच मानसिक तणाव कमी करुन, मन शांत करणारी आहे.
mudra2
हाताची मध्यमा, अनामिका आणि करंगळी दुमडून, तर्जनी ताठ ठेऊन अंगठ्याने मध्यमेच्या टोकाला स्पर्श केला जातो ती मुद्रा ‘वज्र मुद्रा’ आहे. एखाद्या वस्तूकडे बोट दाखविताना ज्या प्रकारे आपण तर्जनी ताठ ठेवतो, तशी ही मुद्रा आहे. या मुद्रेमुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण वाढते. कमी रक्तदाबामुळे थकवा, चक्कर येत असल्यास या मुद्रेने गुण येतो. ज्यांना सिगारेट आणि तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त व्हायचे असेल त्यांनीही ही मुद्रा नियमित करावी. हाताची अनामिका आणि अंगठ्याची टोके जुळवून केलेल्या मुद्राला ‘पृथ्वी मुद्रा’ म्हटले जाते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीरातील चरबी कमी करण्यासाठी ही मुद्रा उपयुक्त आहे. सर्दी कमी करण्यासही या मुद्रेचा उपयोग सांगितला गेला आहे.
mudra3
हाताची तर्जनी दुमडून तर्जनीच्या मध्यावर अंगठ्याने हलका दाब देण्याच्या क्रियेला ‘वायू मुद्रा’ म्हटलेले आहे. पोटाच्या विकारांसाठी ही मुद्रा उपयुक्त असून, छातीमध्ये वेदना होत असल्यास, किंवा खांदे, गुडघे आणि इतर सांधेदुखी कमी करण्यासही ही मुद्रा उपयुक्त आहे. दोन्ही हातांच्या करांगुलींची टोके एकमेकांना जुळवून केली जाते ती ‘कनिष्ठा मुद्रा’. उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ही मुद्रा उपयुक्त आहे. काही कारणाने मळमळत असल्यास, बद्धकोष्ठ असल्यास, किंवा अपचन झाल्यास, या समस्या दूर करणारी ही मुद्रा आहे. या मुद्रेमुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment