महाभारतकालीन कर्ण सरोवर

karnal
महाभारतात कर्ण हे एक महत्वाचे पात्र होते. वास्तविक पांडवांचा हा मोठा भाऊ, सूर्यपुत्र. कुंतीला कुवारपणी झाला आणि जन्मताच त्याला नदीत सोडले गेले अशी त्याची जन्मकथा. अत्यंत गुणी असून
ही दुर्दैवी ठरलेला कर्ण आजही अनेकांचा आवडता आहे. याच कर्णाच्या नावाचे तत्कालीन सरोवर किंवा झील दिल्ली आणि चंदिगढ याच्या मधोमध म्हणजे दोन्ही बाजूनी १२५ किमी अंतरावर हरियाना राज्यात कर्नाल येथे आहे. हे स्थान गेली अनेक वर्षे दुर्लक्षित होते मात्र आता ते पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले गेले आहे. मित्रपरिवार, कुटुंबीय यांच्यासोबत छोटी ट्रीप करण्यासाठी हे अतिशय सुंदर स्थान आहे.

येथे विशाल सरोवरात बोटिंग करता येते. मुलांना खेळण्यासाठी आउटडोअर खेळ आहेत. अनेक रेस्टॉरंटस, हरियानवी ढाबे, फूड पॉइंटस क्षुधा शांतीसाठी सज्ज आहेत. अगदी फास्टफूड सुद्धा येथे मिळते. हरियाना सरकारने हे स्थळ पर्यटनाच्या नकाशावर यावे यासाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. हे नैसर्गिक सरोवर २२०० चौरस मीटरचे असून आजूबाजूला छान झाडी आणि हिरवळ आहे.

karntaa;l
पौराणिक कथेनुसार सूर्यपुत्र कर्ण याच सरोवरात रोज स्नानासाठी येत असे. त्याकाळी येथे काठावर मंदिरे होती तेथे तो पूजा करत असे. या ठिकाणी कर्ण दररोज स्नान झाल्यावर १२५ किलो सोने दान करत असे. पांडवांबरोबर त्याने लढू नये आणि अर्जुनाला ठार करू नये यासाठी कुंती पहाटे कर्ण स्नानासाठी आला तेव्हा त्याला भेटली आणि तिने त्याला तो पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ असल्याचे गुपित सांगितले होते. याच सरोवराकाठी अर्जुनाचा गुरु आणि पिता इंद्र याने कर्णाची कवचकुंडले त्याच्याकडून दान म्हणून मागून घेतली होती. त्यावेळी इंद्र ब्राह्मणाचे रूप घेऊन आला होता. कथा सांगते या कवचकुंडलामुळे कर्णाला मारणे अवघड होते आणि त्याला ठार करता यावे यासाठी इंद्राने कपटाने म्हणजे खोटे रूप घेऊन ती दान म्हणून त्याच्याकडून घेतली व त्यामुळेच अर्जुनाला कर्णाला ठार मारणे शक्य झाले होते.

हे सरोवर हरियाणाचा कर्नाल गावात असून या गावाचे नाव कर्णताल असे होते त्याचा अपभ्रंश होऊन ते कर्नाल असे झाले असेही सांगतात.

Leave a Comment