अमेरिकेमध्ये हे ‘मार्गदर्शक बाण’ कशासाठी?

arrow
अमेरिकेमध्ये, त्या देशाच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती, वास्तूरचना उभ्या आहेत. यातील अनेक इमारती आता सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे बनली आहेत, किंवा त्यांचा उपयोग आता इतर सरकारी कामांसाठी केला जात आहे. मात्र या ऐतिहासिक रचनांमध्ये काही अशा आहेत, ज्यांचा त्याकाळी असलेला उपयोग आताच्या काळामध्ये संपुष्टात आल्यानंतर या रचना आता दुर्लक्षित होऊन गेल्या आहेत. मात्र एके काळी या रचनांचे मोठे महत्व होते. अशा रचनांमध्ये अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी सापडणारे मोठमोठे कॉन्क्रीटचे ‘मार्गदर्शक’ बाण समाविष्ट आहेत. अमेरिकेतील नेव्हाडा, यूटाह या प्रांतांमधील ओसाड भागांमध्ये असे अनेक मार्गदर्शक बाण पहावयास मिळतात. या प्रान्तांवरून हवाई सफर करताना हे आकाराने भले मोठे बाण विमानातूनही सहज दिसून येतात. किंबहुना एके काळी हेच या बाणांच्या अस्तित्वामागील खरे उद्दिष्ट होते.
arrow1
हे मोठमोठे मार्गदर्शक बाण त्याकाळी वैमानिकांना अमेरिकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने बनविले गेले होते. विमान योग्य दिशेला चालले आहे किंवा नाही हे कळणे सुकर व्हावे म्हणून हे बाण बनविले गेले होते. १९२०च्या पूर्वीच्या काळामध्ये दूरवर राहणाऱ्या आप्त स्वकीयांसाठी पत्रे किंवा काही वस्तू पाठविण्याचे काम अमेरिकेमध्ये ‘एअरमेल’ द्वारे सुरु झाले. १९१८ साली अशा प्रकारची एअरमेल सुविधा सुरु करण्यात आली. त्याकाळी सात वैमानिकांचा समावेश असलेली ‘ट्रान्सकॉन्टिनेन्टल डिलिव्हरी’ सिस्टम सुरु झाली.
arrow2
एअरमेलच्या सुविधेचा वापर करून पत्रे किंवा भेटवस्तू इच्छित स्थळी कमी अवधीत पोहोचत असल्या, तरी यामध्येही अनेक अडचणी होत्या. एक तर त्याकाळी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, म्हणजेच जीपीएस, किंवा रडार सारख्या, विमानाचा मार्ग निश्चितपणे दर्शविणाऱ्या सुविधांचे शोध अद्याप लागायचे होते, त्यामुळे आकाशातून उड्डाण करत असताना जमिनीवर दिसत असलेल्या ओळखीच्या खुणा पाहूनच वैमानिकांना आपला मार्ग योग्य असल्याचे समजून घ्यावे लागत असे. त्यातून जर उड्डाणे रात्रीच्या वेळी असतील, किंवा हवामान खराब असेल, तर या ओळखीच्या खुणा दृष्टीला न पडण्याची शक्यता अधिक होती.
arrow3
ही अडचण दूर करण्यासाठी १९२३ साली कॉंग्रेसने २,६२९ मैलांची मार्गदर्शक बाणांची मालिका संपूर्ण देशामध्ये बनविण्याचा निर्णय घेतला. हे मार्गदर्शक बाण दर दहा मैलांच्या अंतरावर बनविले जाणार असून, यांच्या जवळच पन्नास फुट उंचीचा टॉवर उभा केला जाऊन या टॉवरवर वैमानिकांना दिसेल असा झगमगता दिवा (beacon) लावण्याची योजना बनविण्यात आली. या टॉवरवरील दिव्यांमुळे मार्गदर्शक बाण कुठल्या दिशेकडे दाखविला गेला आहे त्यावरून वैमानिकांना आपल्या मार्ग निश्चित करता यावा हे या मागील उद्दिष्ट होते. त्याप्रमाणे ही सुविधा उपलब्ध झाली खरी, पण त्या नंतर काही वर्षांच्या काळानंतर जीपीएस आणि रडार सारख्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर हे टॉवर आणि हे मार्गदर्शक बाण कालबाह्य झाले.

Leave a Comment