हवन करताना ‘स्वाहा’चे उच्चारण का केले जाते?

havan
हिंदू धर्मामध्ये होमहवानाला विशेष महत्व दिले गेले आहे. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये हवनाचे महत्व मोठे आहे. विवाहसमारंभ, उपनयन संस्कार असला, किंवा इतर कुठलेही धार्मिक अनुष्ठान असले, की होमहवन आवर्जून केले जाते. हवन करीत असताना मंत्रोच्चारण करून ‘स्वाहा’चे उच्चारण करीत समिधा, किंवा प्रसाद, हवनकुंडातील अग्नीला समर्पित केले जातात. समिधा, तूप, किंवा इतर काही गोष्टी अग्नीला अर्पण करीत असताना ‘स्वाहा’चे उच्चारण केले जाण्यामागे काही विशिष्ट कारणे आहेत. ‘स्वाहा’ या उच्चाराचा अर्थ आपण अर्पण केलेली वस्तू योग्य आणि सुरक्षित रीतीने इच्छित स्थळी पोहोचावी अशी प्रार्थना.
havan1
पुराणांमध्ये ‘स्वाहा’चा उल्लेख अग्नीची पत्नी असा केलेला असून, हवन करीत असताना प्रत्येक मंत्राच्या शेवटी ‘स्वाहा’चे उच्च्चारण केले जाणे अगत्याचे मानले गेले आहे. आपण करीत असलेल्या हवानाचा स्वीकार जो पर्यंत देवता करीत नाहीत, तो पर्यंत हवनाचे इच्छित फल आपल्याला मिळत नसल्याचे म्हटले जाते. पण अग्नीच्या द्वारे आणि ‘स्वाहा’च्या माध्यमातून अर्पण केलेली प्रत्येक वस्तू देवता स्वीकार करीत असल्याने हवन करीत असताना अग्नीला कुठलीही वस्तू अर्पण करताना ‘स्वाहा’ म्हटले जाते.
havan2
पुराणांच्या अनुसार अग्नीची पत्नी स्वाहा ही प्रजापती दक्षाची कन्या असून, स्वाहाच्या माध्यमातूनच अग्नी हविष्य ग्रहण करीत असतात आणि हे हविष्य देवतांना प्राप्त होते. स्वाहाशी निगडित आख्यायिका अशी, की स्वाहाचा विवाह अग्नीदेवांशी, इतर देवतांच्या आग्रहास्तव झाला. तिच्या मार्फत अर्पण केलेले हविष्य देवतांना प्राप्त होईल असा आशीर्वाद श्रीकृष्णाने स्वाहाला दिले असल्याची ही आख्यायिका आहे.

Leave a Comment