रिंकूच्या कागरचा टिझर रिलीज

kaagar
मराठी सिनेसृष्टीत सैराट चित्रपटाने घातलेला धुमाकुळ तुम्हाला माहितीच असेल पण याच चित्रपटाने सिनेसृष्टीला रिंकु राजगुरु नावाची एक अभिनेत्री दिली. रिंकु राजगुरु आता कागर या चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांमध्ये हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिंकूचे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचे आयुष्य आणि त्यानंतरच्या बदलाची छोटीशी झलक १ मिनिट २१ सेकंदांच्या या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. प्रियकरावर अतोनात प्रेम करणारी रिंकू त्याला राजकारणात कसे वागावे त्याचे धडे देतानाही दिसत आहे.

दोघांचे प्रेम फुलत असतानाच रिंकूच्या प्रियकराचा मृत्यू होतो आणि रिंकूचा त्यानंतरचा राजकीय प्रवास टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. सैराटप्रमाणे या सिनेमातही रिंकूच्या आवाजाचा तोड बाज असल्यामुळे वेगळ्या विषयावरील सैराटचाच टीझर तर आपण पाहत नाही ना असा भास प्रेक्षकांना होतो. पण हा टीझर प्रेक्षकांना गुंतवणून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. टीझर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘कागर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी केले आहे. तर सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. याआधी हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र रिंकूची १२ वीची परीक्षा असल्यामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट आता २६ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment