एक कोटी रुपये, परदेश यात्रा – निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांचे अच्छे दिन!

election
निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्सव! निवडणुका म्हणजे नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या नाकदुऱ्या काढण्याचे दिवस. निवडणुकीच्या हंगामात आपले कार्यकर्ते सांभाळण्यासाठी नेतेमंडळी नाना उपाय करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचीही खाण्यापिण्याची चांगलीच ‘सोय’ होते. निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेल्या कार्यकर्त्यांचे कौडकौतुक सर्वपक्षीय उमेदवारांकडून पुरवण्यात येतात. एकेकाळी कार्यकर्ते भेळभत्ता खावून राजकीय पक्षांचे काम करीत होते. अगदी प्रारंभीच्या काळात कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रचार करायचे. प्रसंगी पदरमोड करून कार्यकर्ते चहापाण्याचा खर्च भागवायचे.

आता मात्र दिवस बदलले आहेत. बदलत्या काळानुसार राजकारणाचेही व्यापारीकरण झाले आणि पक्षांना कार्यकर्ते मिळणे मुश्किल झाले. त्यामुळे या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने ठेवण्यासाठी राजकारण्यांना विविध कसरती कराव्या लागत आहेत. याचा ढळढळीत पुरावात तमिळनाडूत पाहायला मिळत आहे.

तमिळनाडूत निवडणुकीच्या काळात मतदारांना टीव्ही संचापासून साड्यांपर्यंत अनेक वस्तू मोफत वाटण्याची मोठी परंपरा आहे. राज्यात मतदारांना प्रलोभन दाखविण्याची ही पद्धत एवढी रुजलेली आहे, की मोठ्या प्रमाणावर तिचा वापर केल्यामुळे निवडणूकच रद्द करण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली होती. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या आर. के. नगर मतदारसंघात पोटनिवडणूक होत असताना मतदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आल्याचे उघडपणे बोलले जात होते. ही चर्चा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे तसेच त्याचे पुरावे पुढे आल्यामुळे निवडणूक आयोगाने ती पोटनिवडणूक पुढे ढकलली.

मात्र यंदाच्या निवडणुकांमध्ये नेत्यांना मतदारांना तर खुश करावे लागत आहेच, शिवाय कार्यकर्त्यांचीही मर्जी राखावी लागत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बोनसचे आमिष दाखविण्यात येत आहेत. आपल्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोन्याची चेन आणि अंगठी इथपासून ते परदेश यात्रेपर्यंतची आमिषे दाखविण्यात येत आहेत.

वेलूर येथून पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या कदिर आनंद या उमेदवारावर प्राप्तिकर खात्याची नजर गेली. त्यातून हा ट्रेंड समोर आला. प्राप्तिकर खात्याने शनिवारी टाकलेल्या छाप्यात आनंद यांच्याकडून 10 लाख रुपयांची नगदी जप्त केली. आनंद हे द्रमुक पक्षाचे कोषाध्यक्ष एस. दुरैमुरुगन यांचे चिरंजीव आहेत.

आनंद यांच्या निमित्ताने हा प्रकार समोर आला असला तरी त्याची सुरूवात माजी केंद्रीय मंत्री व अरक्कोनम मतदारसंघातील द्रमुकचे उमेदवार जगतरक्षकन यांनी केली. आपल्या लोकसभा मतदारसंघातील ज्या विधानसभा मतदारसंघातून मला सर्वाधिक मते मिळतील, त्या मतदारसंघाच्या प्रभाऱ्याला मी 1 कोटी रुपये असे त्यांनी जाहीर केले आहे. अरक्कोनम मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. जगतरक्षकन यांच्या ताब्यात शैक्षणिक संस्थांची एक शृंखला असून तमिळनाडूतील चार अब्जोपती उमेदवारांपैकी ते एक आहेत.

गंमत म्हणजे त्यांच्या पक्षाने त्यांच्या या पक्षाची भलामण केली आहे. जगतरक्षकन यांनी दिलेले हे ‘इन्सेंटिव्ह’ एखाद्या विद्यार्थ्याला चांगली कामगिरी करण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनासारखेच आहे. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबळ वाढेल आणि त्यांच्यात एक निरोगी स्पर्धा निर्माण होईल, असे दुरैमुरुगन यांनी म्हटले आहे. स्वतः दुरैमुरुगन यांनीही अशाच प्रकारची घोषणा केली आहे. आपल्या मुलाच्या वेलूर मतदारसंघातील ज्या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मते मिळतील, त्याच्या प्रभाऱ्याला स्वतःच्या खात्यातून ते 50 लाख रुपये देतील असे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्या पैशांचा उपयोग विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या कामासाठी करावा लागेल, अशी अट त्यांनी घातली आहे.

अर्थात यात अन्य पक्षही मागे नाहीत. वेलूरमधीलच अण्णा द्रमुक पक्षाचे उमेदवार ए. सी. षण्मुगम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बुलेट मोटारसायकलपासून देशांर्गत व परदेश प्रवासाचे आश्वासन दिले आहे.

तमिळनाडूतील यंदाच्या लोकसभा निवडणुका अत्यंत रोचक आणि अटीतटीच्या ठरणार आहेत. अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष आपल्या सर्वात प्रभावी नेत्यांच्या म्हणजेच अनुक्रमे जे. जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्याशिवाय मैदानात उतरले आहे. त्यांना आपली प्रतिष्ठा कायम ठेवायची आहे. तर काँग्रेस व भाजपला आपला जनाधार नव्याने निर्माण करण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार झाली आहे आणि त्याच्याच परिणामी कार्यकर्त्यांना हे अच्छे दिन आले आहेत!

Leave a Comment