नवसाला पावणारी राजधानी दिल्लीतील ही मंदिरे

temple
भारतामध्ये प्रत्येक शहरामध्येच नाही, तर अगदी आडवळणाला एखादे गाव असले, तरी त्या गावामध्ये भाविकांचे श्रद्धास्थान असणारे, एखादे मंदिर हटकून असतेच. या मंदिरांमध्ये दर्शनाला आल्यावर प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होत असल्याची भाविकांची मान्यता असते. भाविकांनी केलेल्या नवसाला पावणारी, प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारी अशी काही प्रसिद्ध देवस्थाने राजधानी दिल्लीमध्ये ही आहेत. दिल्लीतील चांदणी चौकामध्ये असलेल्या दिगंबर जैन लाल मंदिराचे निर्माण सतराव्या शतकामध्ये करण्यात आले होते. या मंदिराची रचना काहीशी वेगळी आहे. या मंदिरामध्ये दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने या मंदिरामध्ये भाविक नेहमीच मोठ्या संख्येने येत असतात.
temple1
दिल्लीचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅनॉट प्लेस या परिसरामध्ये असणाऱ्या हनुमान मंदिराचीही मोठी ख्याती आहे. हे मंदिर राजधानी दिल्लीतील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचे निर्माण महाभारतकालीन असल्याच्या ही अनेक आख्यायिका आहेत. या मंदिरामध्ये विराजमान असलेले बजरंगबली भाविकांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे म्हटले जाते. १७६४ साली निर्माण करविले गेलेले कालकाजी मंदिरही दिल्लीतील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरामध्ये दुर्गा देवी कालीमातेच्या रूपात विराजमान असून, भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारी आहे. या मंदिरामध्ये नवरात्रीच्या दिवसांत भाविकांची प्रचंड गर्दी असते.
temple2
दिल्लीच्या जवळ छत्तरपूर येथे असणारे मंदिर दिल्लीतील अतिशय सुंदर वास्तूरचना असलेल्या मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा परिसर विशाल असून, सुमारे सत्तर एकर क्षेत्रामध्ये या मंदिराचा परिसर विस्तारलेला आहे. आपले इच्छित पूर्ण व्हावे याचा नवस बोलण्यासाठी असंख्य भाविक येथे आवर्जून दर्शनाला येत असतात.

Leave a Comment