तीस लाख निर्दोष भारतीयांचा मारेकरी चर्चिल!

Winston-Churchill
विन्स्टन चर्चिल! एक जागतिक पातळीवरचा नेता आणि महान मुत्सद्दी म्हणून नावाजलेले व्यक्तिमत्त्व!! याच चर्चिल यांनी ब्रिटिश पंतप्रधान असताना जाणूनबुजून भारतीयांना भूकबळी होण्यास भाग पाडले होते, असे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) गांधीनगरमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनाने चर्चिलचा बुरखा फाडण्यात मदत केली आहे. दुष्काळाच्या नावाखाली या माणसाने भारतीयांची कत्तल केल्याचे त्यातून निर्विवाद सिद्ध होते.

भारतात दरवर्षी सरासरी 90 ते 110 टक्के पाऊस पडतो. म्हणजे एखाद्या वर्षी पावसाचे पाणी जास्त होते तर एखादे वेळीस अतिवृष्टी होते. अलीकडे हवामान बदलामुळे दुष्काळ वारंवार पडतो आणि त्याची चर्चाही होती. मात्र धरणे, बंधारे आणि मुख्यतः टँकरच्या व्यवस्थेमुळे पाण्याची टंचाई व दुष्काळाच्या झळा काही अंशी कमी झाल्यात. मात्र जगातील सर्वात भयानक दुष्काळ म्हणता येईल, असा दुष्काळ याच भारतात पडला होता आणि तेही स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी चार-वर्षे आधी. ‘दि बंगाल फेमिन ऑफ 1943’ या नावाने हा दुष्काळ ओळखला जातो. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा दुष्काळ अजिबात नैसर्गिक नव्हता, तो पूर्णपणे कृत्रिम होता. ब्रिटिश पंतप्रधान चर्चिलच्या कुटिल धोरणांमुळे आलेल्या या विपत्तीने तब्बल 30 लाखांहून अधिक भारतीयांचा जीव घेतला!

आयआयटी गांधीनगरमधील प्राध्यापक विमल मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ताजे संशोधन केले असून ते जियोफिजिकल रिसर्च लेटर या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधकांनी 1876 पासून 2016 पर्यंतच्या तमाम दुष्काळांचा अभ्यास केला. त्यावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला, की बाकी सर्व दुष्काळ हे निसर्गाच्या लहरीमुळे निर्माण झाले होते, तर 1943मधील दुष्काळ चर्चिल यांनी स्वतः घडवला होता.
एखादा दुष्काळ वैयक्तिकरीत्या निर्माण करता येऊ शकतो का? होय, चर्चिल यांनी ते करून दाखवले. त्यांनी भारताच्या वाट्याचे लाखो टन धान्य ब्रिटनमध्ये नेले होते. युरोपात 1939 ते 1945 पर्यंत दुसरे महायुद्ध सुरू होते. त्यावेळी धान्यासह अन्य अनेक प्रकारचे साहित्य हवे होते. निव्वळ बेट असलेल्या ब्रिटनकडे साहित्य होतेच कुठे? म्हणून भारतासारख्या ब्रिटिशांच्या ताब्यातील देशांमधून साहित्याची लूट करून ती ब्रिटनला देण्यात आली. जानेवारी ते जुलै 1943 पर्यंत भारतातून 70 हजार टन तांदूळ ब्रिटनला नेण्यात आला.याचा परिणाम अशा झाला, की धान्याची कोठारे रिकामी झाली आणि गंगा व तिस्ता नदीसारख्या नद्या वाहणाऱ्या बंगालात भूकबळीची वेळ आली.

लेखिका मधुश्री मुखर्जी यांनी लिहिलेल्या चर्चिल्स सीक्रेट वॉर या पुस्तकात याच दुष्काळाची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. त्या दुष्काळातून वाचलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार, बंगालमधील लोकांना जीवंत राहण्यासाठी झाडांची पाने आणि गवत खावे लागले होते. अनेक महिलांनी कुटुंबाच्या पोटासाठी मजबुरीने वेश्यावृत्ती सुरू केली होती.

बंगालमध्ये 1943 मध्ये धान्य उत्पादनात कुठलीही टंचाई नव्हती. उलट 1941 च्या तुलनेत उत्पादन पहिल्यापेक्षा जास्त होते.ही परिस्थिती माहीत असूनही चर्चिल यांनी अमेरिका आणि कॅनडाने देऊ केलेल्या धान्याच्या मदतीला नाकारले होते. अमेरिका आणि कॅनडा त्या काळी दुष्काळाने होरपळत असलेल्या राज्यांना मदतीचा प्रस्ताव ठेवला होता, असे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांचे म्हणणे आहे.

थोडक्यात म्हणजे भारतीयांचा जीव घेण्याच्या हेतूनेच चर्चिलने आपली धोरणे राबविली. चर्चिल यांनी पंतप्रधान बनल्यापासून भारत आणि भारतीयांचा द्वेष केला. भारतीय जनता त्यांच्या दृष्टीने किडा-मुंग्यापेक्षा जास्त नव्हती. गांधीजींना अर्धनग्न फकीर म्हणणे चर्चिलच! भारतातून होईल तेवढे शोषण करणे हेच त्यांचे ब्रीदवाक्य होते. बंगालमधील या भूकबळींची माहिती येथील अधिकाऱ्यांनी लंडनला पाठवली तेव्हा चर्चिलचे उत्तर होते, “(महात्मा) गांधी अजून का मेले नाहीत?”

अशा या नेत्याला जागतिक मुत्सद्दी म्हणून अजूनही मनले जाते. या उजळ चेहऱ्याच्या मागे लपलेला एक रक्तरंजित चेहरा या निमित्ताने जगासमोर आला आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्याचे हात भारतीयांच्या रक्ताने भरलेले असल्याचे पुढे येत आहे. चर्चिलच्या या कृत्याला सामुहिक नरसंहाराचा (जिनोसाईड) दर्जा द्यावा. इतकेच नव्हे तर ब्रिटनकडून माफी घ्यावी आणि नुकसान भरपाईही घ्यावी, अशी चर्चा इतिहास अभ्यासकांमध्ये निर्माण झाली आहे. त्याला बळ देणे हे आपले काम आहे.

Leave a Comment