व्यवसायाला सुरुवात करून सत्तर वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतर, आजही आपल्याला काम करताना तितकाच आनंद होतो असे म्हणणारे या जगामध्ये किती असतील ? मात्र हॉलीवूड मधील सर्वात वयस्क अभिनेते म्हणून ओळखले जाणारे नॉर्मन लॉईड मात्र आज वयाच्या १०४व्या वर्षी देखील तरुणपणीच्या उत्साहानेच काम करीत आहेत. नॉर्मन यांची हॉलीवूडमधील कारकीर्द तब्बल सत्तर वर्षांची आहे. ‘संडे पोस्ट’च्या वतीने नुकतेच या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नॉर्मन यांचा जन्म १९१४ साली न्यू जर्सीमध्ये झाला. आता १०४ वर्षांचे नॉर्मन मात्र आजही पूर्वीप्रमाणेच काम करण्याची इच्छा मनामध्ये बाळगून आहेत. १९४२ साली आल्फ्रेड हिचकॉक यांच्या ‘सॅबट्युअर’ या चित्रपटामध्ये नॉर्मन यांना प्रथम महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक हॉलीवूड चित्रपटांमधून भूमिका केल्या. २०१५ साली अभिमेत्री एमी शुमर हिच्यासोबत त्यांनी ‘ट्रेनरेक’ या चित्रपटामध्ये केलेली भूमिका अतिशय गाजली. या चित्रपटानंतरही नॉर्मन यांना अनेक माहितीपटांमध्ये काम मिळाले असून, जेव्हापर्यंत शक्य असेल, तेव्हापर्यंत काम करत राहण्याची आपली इच्छा असल्याचे नॉर्मन म्हणतात.
नॉर्मनचा जन्म अशा काळामध्ये झाला, जेव्हा अमेरिकेवर मोठे आर्थिक संकट ओढविले होते. तेव्हा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्यासाठी नॉर्मनने लहानमोठ्या नाटकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९४२ साली त्यांनी हिचकॉक यांच्या चित्रपटामध्ये केलेली भूमिका गाजल्यानंतर नॉर्मनला खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून ओळख लाभली. या चित्रपटामध्ये नॉर्मन यांनी एका नाझी गुप्तहेराची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर नॉर्मन आणि आल्फ्रेड हिचकॉक यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली आणि याच मैत्रीखातर हिचकॉक यांनी नॉर्मनला आपल्या अनेक चित्रपटांमध्ये निर्माता आणि सहदिग्ददर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली.
नॉर्मनने हिचकॉक यांच्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्याचबरोबर नॉर्मन नाटकांमध्येही अभिनय करीत होते. १९७०-८० च्या काळामध्ये नॉर्मन यांनी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये अभिनय केला, आणि त्यांनी भूमिका केलेल्या ‘क्विन्सी’, ‘मर्डर शी रोट’ यांसारख्या मालिका अतिशय लोकप्रिय ठरल्या. तसेच ‘सेंट एल्सव्हेअर’ या मालिकेमध्ये नॉर्मनने साकारलेली ‘डॉक्टर डॅनियल आउसलांडर’ ही भूमिकाही विशेष लोकप्रिय झाली. वास्तविक नॉर्मन यांची या मालिकेतील भूमिका केवळ चारच भागांपुरती होती, पण ही भूमिका थोड्याच अवधीमध्ये इतकी गाजली, की ही भूमिका या मालिकेमध्ये कायमस्वरूपी करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. १९८९ साली सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते रॉबिन विलियम्स यांच्याबरोबर ‘डेड पोएट्स सोसायटी’ हा नॉर्मनचा चित्रपटही अतिशय लोकप्रिय ठरला. नॉर्मनने आजवर आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीमध्ये ओर्सन वेल्स, चार्ली चॅप्लिन यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांच्या सोबतही काम केले आहे.