शाहरुखच्या घरी आमिरने भोजनाचे आमंत्रण स्वीकारले तेव्हा…

aamir-khan
अभिनेता आमीर खान बॉलीवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. एखाद्या चित्रपटामध्ये साकारत असलेल्या भूमिकेसाठी त्याने त्या भूमिकेचा केलेला अभ्यास, स्वतःच्या देहयष्टीमध्ये अतिशय कमी वेळामध्ये घडवून आणलेले अमूलाग्र परिवर्तन या गोष्टींसाठी आमिर ज्या पद्धतीने मेहनत घेत असतो, त्याला खरेच तोड नाही. ‘दंगल’ या चित्रपटासाठी वाढू दिलेले वजन, आमिरने अतिशय शिस्तबद्ध रीतीने आपल्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणत, आहारावर नियंत्रण ठेवत आणि त्याला व्यायामाची जोड देत अवघ्या काही महिन्याच्या अवधीतच घटविले होते.
aamir-khan1
एका पुस्तक प्रकाशानाच्या वेळी आपल्या या अनुभवांबद्दल आमिर बोलत होता. त्यावेळी एखाद्या चित्रपटासाठी आपल्या देहयष्टीमध्ये परिवर्तन घडवून आणणे दिसायला सोपे असले, तरी करायला मात्र अतिशय अवघड असल्याचे आमिर म्हणाला. भूमिकेला साजेलसे परिवर्तन स्वतःमध्ये घडवून आणण्यासाठी शिस्त, जिद्द आणि मेहनतीची आवश्यकता असून, याचे उदाहरण देण्यासाठी आमिरने काही काळापूर्वी घडलेला एक प्रसंग कथन केला. शाहरुख खानच्या घरी आमिरला भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते तेव्हाचा हा प्रसंग असल्याचे आमिरने सांगितले.
aamir-khan2
अॅपल कंपनीचे सीइओ टिम कुक भारतामध्ये, मुंबईत आले असता, शाहरुख खानने टिम कुक यांना आपल्या घरी भोजनाचे आमंत्रण दिले होते. याच भोजनासाठी आमिरला ही आमंत्रण दिले गेले होते. आमंत्रणाचा स्वीकार करीत आमिरने शाहरुखच्या घरी आयोजित केलेल्या मेजवानीला हजेरी लावली, पण स्वतःचा घरचा भोजनाचा डबा बरोबर घेऊन. यावर भोजन समारंभासाठी उपस्थित सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. खुद्द मेजवानीचे यजमान शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान हे देखील आश्चर्यचकित झाले. पण आमिर तेव्हा ‘दंगल’ चित्रपटासाठी वाढू दिलेले वजन घटविण्याच्या प्रयत्नात असल्याने त्याच्या आहारासाठी काही नियम आहारतज्ञांनी आखून दिले होते. त्यामुळे एखाद्या मेजवानीसाठी जात असतानाही आमिर आपल्या आहारतज्ञांनी आखून दिलेल्या नियमांच्या अनुसार बनलेले भोजन आपल्यासोबत घरूनच घेऊन जात असे. आमिर किती शिस्तप्रिय आहे, आणि त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून का ओळखले जाते हे या घटनेवरून आपल्या पुरेपूर लक्षात येते.
aamir-khan3
‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाने अपयश पाहिल्यानंतर सध्या आमिर त्याच्या आगामी ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटावर काम करीत आहे. अतिशय गाजलेला, टॉम हँक्स अभिनीत हॉलीवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटावर आमिरचा आगामी चित्रपट आधारलेला आहे.

Leave a Comment