बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये झळकल्या या शिक्षणसंस्था

collage
अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये चित्रपटाच्या नायकाची आणि नायिकेची प्रथम भेट महाविद्यालयामध्ये होते आणि मग तिथून त्यांची प्रेमकथा सुरु होत असल्याचे आपण पाहतो. याच कथानकाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयामध्ये शिकणारे नायक आणि नायिका दर्शविण्यासाठी चित्रपटामध्ये एखाद्या महाविद्यालयाचे दर्शन घडविणेही अपरिहार्य असते. त्यामुळे खास बॉलीवूडच्या कथानकासाठी साजेशा, मायानगरी म्हणून ओळखल्या जाणऱ्या मुंबईतील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण होत आले आहे.
collage1
मुंबईचे झेविअर्स कॉलेज बॉलीवूडचे विशेष आवडते असून, दक्षिण मुंबईमध्ये असलेले हे महाविद्यालय आजवर अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहे. या यादीमध्ये अतिशय गाजलेल्या ‘कुछ कुछ होता है’ पासून अगदी अलीकडच्या काळामध्ये राणी मुखर्जी अभिनीत ‘हिचकी’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘जाने तू या जाने ना’, ‘हेलिकॉप्टर ईला’, आणि ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांचे चित्रीकरण याच महाविद्यालयामध्ये झाले आहे. नेटफ्लिक्स वर प्रसारित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसिरीजमधील काही दृश्येही याच महाविद्यालयामध्ये चित्रित करण्यात आली आहेत. मुंबईमधील विल्सन महाविद्यालयामध्ये आमीर, सैफ आणि अक्षय खन्ना अभिनीत ‘दिल चाहता है’ या चित्रपटातील काही दृश्ये चित्रित करण्यात आली होती.
collage2
मुंबईमधील ब्रीच कॅन्डी परिसरामध्ये असलेल्या प्रतिष्ठित सोफिया महाविद्यालयामध्ये शाहीद कपूर आणि अमृता राव अभिनित ‘इश्क विश्क’ चित्रपट चित्रित करण्यात आला होता. त्याचबरोबर ‘मर्डर’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘गुड बॉय बॅड बॉय’, मराठी चित्रपट ‘क्लासमेट्स’ आणि इतरही अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या महाविद्यालयामध्ये झाले आहे. मुंबई येथील हासाराम रिझुमल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स हे महाविद्यालय ‘एचआर महाविद्यालय’ या नावाने ओळखले जाते. मुंबईतील चर्चगेट भागामध्ये असलेल्या या महाविद्यालयामध्ये रणबीर कपूर अभिनीत ‘वेक अप सिड’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. अक्षय कुमार अभिनीत ‘गब्बर इज बॅक’ आणि २०११ साली प्रदर्शित झालेला ‘कच्चा लिंबू’ या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण मुंबईतील बांद्रामधल्या प्रतिष्ठित सेंट अँड्र्यूज स्कूल मध्ये झालेले आहे.

Leave a Comment