राजपूत वास्तूशैलीचे उत्तम उदाहरण – दतिया पॅलेस

datia
या वास्तूपासून प्रेरणा घेऊन सर एडविन लुट्येन्स यांनी राजधानी दिल्लीतील अनेक वास्तूंची रचना केल्याचे म्हटले जाते. अशी ही वास्तू भारतामध्ये आज ही अस्तित्वात असलेल्या प्राचीन वास्तूंपैकी, राजपूतकालीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असून, मध्य प्रदेशातील ग्वालियरपासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दतिया येथे दिमाखात उभी आहे. स्थानिक नागरिकांमध्ये ‘गोविंद पॅलेस’ किंवा ‘गोविंद मंदिर’ या नावाने परिचित असणारी ही भव्य वास्तू ‘दतिया पॅलेस’ या नावानेही प्रसिद्ध आहे. या सात मजली इमारतीमध्ये जमिनीच्या खालीही दुमजली ‘बेसमेंट’ बनविले गेले आहे. या वास्तूचे निर्माण केवळ दगड आणि विटा वापरून केले गेले असून, यामध्ये कुठेही लाकूड किंवा लोखंडाचा वापर केलेला आढळत नाही.
datia1
राजपुताना आणि मुघल वास्तुकलांचे अनोखे मिश्रण असलेली ही वास्तू इंडो-इस्लामिक वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. या वास्तूचा आकार चौकोनी असून, चारही बाजूंना गोल घुमट असलेले मिनार आहेत. महालाच्या चारही बाजूंना पाषाणाचे सुंदर कोरीव काम आहे. या वास्तूचे प्रवेशद्वार पूर्वेला असून, महालाच्या दक्षिणेला कर्णसागर सरोवर आहे. वास्तूच्या मध्यभागी भले मोठे अंगण असून, या ठिकाणी शाही परिवारासाठी खासगी निवासस्थाने बनविली गेली आहेत. शाही निवासस्थाने अंगणाच्या बरोबर मध्यभागी बनविली गेली असून, या निवासस्थानांतून भोवतालच्या इमारतीमध्ये पोहोचण्यासाठी चारही बाजूंनी पूल बनविण्यात आलेले दिसतात.
datia2
दतिया पॅलेसमध्ये एकूण ४४० कक्ष असून, या वास्तूमध्ये अनेक मोकळी अंगणेही आहेत. सर्व वास्तूंच्या माड्या अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या झरोक्यांनी सुशोभित आहेत. वास्तूच्या आतील दालनांमध्ये देखील अनेक सुंदर भित्तीचित्रे, व पर्शियन ढंगाचे चित्रकाम आहे. बुंदेला स्कूल ऑफ आर्ट येथून आणविल्या गेलेल्या अनेक सुंदर पेंटींग्जने या वास्तूची दालने शोभिवंत केली गेली आहेत. या पेंटींग्जची खासियत अशी, की ही पेंटींग्ज भाज्या आणि फळांपासून तयार करण्यात आलेल्या रंगांनी चितारण्यात आली आहेत. दतिया पॅलेसच्या परिसरामध्ये गणेश, दुर्गा या देवादिकांची मंदिरे असून, या वास्तूच्या परिसरामध्ये एक दर्गाही आहे.
datia3
ओरछाचे राजे वीर सिंह यांनी या वास्तूचे निर्माण करविले होते. सोळाव्या ते सतराव्या शतकाच्या सुमाराला बुंदेलखंडामध्ये ही वास्तुशैली नावारूपाला आली असून, बुंदेल राजपुतांच्या अधिपत्याखाली या वास्तूचे निर्माण करविण्यात आले होते. राजधानी दिल्लीचे स्थापत्यकार सर एडविन लुट्येन्स यांच्या मते भारतामधील सर्वोत्तम वास्तूंमधील ही एक वास्तू असून, या वास्तूने आपल्याला प्रेरित केल्याचे त्यांनी म्हटले होते. आजच्या काळामध्ये ओरछा या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असून, दतिया पॅलेस सारखी सुंदर वास्तू मात्र प्रसिद्धीपासून काहीशी वंचित राहिली आहे.

Leave a Comment