या आहेत भारतीय सिनेसृष्टीच्या ‘फर्स्ट लेडीज’

cinema
भारतीय सिनेसृष्टीमध्ये काही दशकांपूर्वी नायिकाप्रधान कथानक असलेले चित्रपट अभावानाचे पहावयास मिळत असत. त्याकाळी चित्रपटाचे कथानक नायकप्रधान असून नायिकांच्या भूमिका केवळ नायकाच्या भूमिकेला पूरक असत. पण अलीकडच्या काळामध्ये मात्र हे चित्र पालटले असून आता नायिकाप्रधान चित्रपटही दर्शकांना पटू लागले आहेत, पसंत पडू लागले आहेत. आताच्या आणि वीस-तीस वर्षांच्या पूर्वीच्या काळाचा विचार करत असतानाच साधारण शंभर वर्षांपूर्वी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री कोण होत्या आणि त्यांची कारकीर्द कशी घडली हे जाणून घेणे ही रोचक ठरेल.
cinema1
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांनी चित्रपटात कामे करणे ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळे अभिनयाची आवड आणि कला अंगी असलेल्या आणि त्यामध्ये कारकीर्द घडवू पाहणाऱ्या स्त्रियांना समाजामध्ये फारसे मानाचे स्थान नव्हते. हा व्यवसाय स्त्रियांसाठी योग्य समजला जात नसल्याने दादासाहेब फाळके यांना ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटासाठी नायिका मिळणे कठीण होऊन बसले. सरतेशेवटी मुंबईच्या ‘रेड लाईट एरीया’ मध्ये जाऊन दादासाहेबांनी आपल्या मनासारखी नायिका मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला, पण तो ही प्रयत्न असफल झाला. अखेरीस अण्णा साळुंखे नामक एका पोरगेल्या युवकाने ‘राजा हरिश्चंद्र’ मध्ये नायिकेची भूमिका साकरली. या चित्रपटाला उदंड यश लाभले. या चित्रपटातील नायिका पाहून अनेक तरुणींना अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची प्रेरणा मिळाली.
cinema2
त्यानंतर १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या ‘मोहिनी भस्मासुर’ या चित्रपटासाठी दुर्गाबाई कामत आणि कमलाबाई गोखले या मायलेकींना भूमिका देऊ केल्या. पण या मायलेकींना त्यांच्या अभिनयकलेची हौस भागविणे चांगलेच महागात पडले. तत्कालीन ब्राह्मण समाजाने या मायलेकींना वाळीत टाकले. या मायलेकींवर घालण्यात आलेल्या सामाजिक बहिष्काराने अभिनयक्षेत्रात येऊ पाहणाऱ्या काही तरुणींच्या महत्वाकांक्षेवर सामाजिक विचारधारेचा लगाम लागला असला, तरी काही धाडसी, प्रगत विचारांच्या स्त्रियांनी मात्र या बंधनाला झुगारून देऊन अभिनेयक्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्या काळी मूक-चित्रपट असल्याने भाषेचे बंधन नव्हते. पारसी समाज हा त्याकाळी पुढारलेला आणि उदारमतवादी समजला जात असल्याने या समाजातील ज्यू स्त्रिया नाटकांमध्ये अभिनय करीत असत.
cinema3
ब्रिटीशांच्या राजवटीमध्ये इंग्लिश लोकांच्या मनोरंजनासाठी युरोपियन भाषांमधील नाटके होत असत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक पारसी नाटक कंपन्यांनी हिंदुस्तानी, उर्दू आणि गुजराती भाषेतील नाटके स्थानिक नागरिकांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यास सुरुवात केली. ‘पारसी नाटक मंडळी’ ही भारतातील पहिली नाटक कंपनी असून, ही गुस्तादजी दलाल यांच्या मालकीची होती. दादाभाई नौरोजी, के आर कामा इत्यादी नामवंत मंडळी या नाटक कंपनीची समर्थक होती. भारतामध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ लागल्यानंतर या नाटक कंपन्यांनी स्वतःचे चित्रपट स्टुडियो काढून त्याद्वारे मिळकत करण्यास सुरुवात केली. यांपैकी मदन थियेटर्स या कंपनीमध्ये बारा अँग्लो-इंडियन तरुणी कामाला असून, या मुलींना चित्रपट क्षेत्रामध्ये कारकीर्द करण्याची इच्छा होती. या तरुणी मुळातच प्रगत विचारांच्या समजल्या जात असल्याने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करताना सामाजिक प्रथा, रूढींना त्यांनी फारसे महत्व दिले नाही.
cinema4
या होतकरू अभिनेत्रींमध्ये प्रामुख्याने नाव येते रुबी मेयर्स यांचे. त्यांचे मूळ नाव जरी रुबी असले, तरी अभिनयक्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांना ‘सुलोचना’ या नावाने ओळखले जाऊ लागले. १९२६ साली प्रदर्शित झालेल्या ‘टेलिफोन नि तरुणी’ नि त्याचवर्षी आलेल्या ‘टायपिस्ट गर्ल’ या चित्रपटांनी त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. इम्पिरियल फिल्म कंपनीची सुपरस्टार बनलेल्या सुलोचना उर्फ रुबीची कमाई त्या काळी मुंबईच्या गव्हार्नरांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जात असे. ‘वाइल्डकॅट ऑफ बॉम्बे’ या चित्रपटामध्ये सुलोचना यांनी आठ भूमिका साकारल्या होत्या.
त्याकाळची आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे एस्थर व्हिक्टोरिया अब्राहम. यांना ‘प्रमिला’ या नावाने ओळखले जात असे. अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी प्रमिला कलकत्त्यातील एका ज्यू शाळेमध्ये शिक्षिका होत्या. दिग्दर्शक रमाशंकर चौधरी यांनी प्रमिलाला एकदा सेटवर पाहिले असता तिने अभिनय करावा अशी सूचना त्यांनी केली. तिथून प्रमिलाची कारकीर्द सुरु झाली. १९४२ साली आलेला ‘उलटी गंगा’ हा त्यांचा चित्रपट विशेष गाजला. प्रमिला त्यांच्या भूमिकेसाठी पोशाख आणि आभूषणे स्वतः डिझाईन करीत असत. त्यांनी डिझाईन केलेले पोशाखही स्त्रियांमध्ये विशेष लोकप्रिय होते. १९४७ साली प्रमिलाने भारताचा पहिला ‘मिस इंडिया’ खिताबही जिंकला होता.
cinema5
१९३१ साली मूक चित्रपटांचे युग संपले आणि त्याचबरोबर या अभिनेत्रींची कारकीर्दही संपुष्टात आली. या काळामध्ये चित्रपटांमध्ये संवादही आले होते, आणि या अभिनेत्रींना भारतीय स्थानिक भाषा अस्खलितपणे बोलता येत नसल्याने त्यांना भूमिका मिळेनाशा झाल्या. भारतातील पहिला बोलपट ‘आलम आरा’मध्ये आधीच्या लोकप्रिय अभिनेत्रींना बाजूला करून नवोदित झुबेदाला नायिकेची भूमिका देण्यात आली. त्यानंतर सिनेसृष्टीत आलेल्या अभिनेत्री उत्तम हिंदी बोलू शकत होत्या, पण त्याचबरोबर अनेकींना उत्तम गाताही येत होते. तेव्हापासून चित्रपटामध्ये गीते ही समाविष्ट झाली आणि त्याचबरोबर जहानारा कज्जन, कानन बाला, देविका रानी, दुर्गा खोटे आणि शांत आपटे यांच्यासारख्या नव्या अभिनेत्रींचे आधिपत्य सिनेसृष्टीवर सुरु झाले.

Leave a Comment