कथा थायलंडच्या राणी सुनंदा कुमारीरतना दुर्दैवी अंताची

thailand
जागतिक इतिहासामध्ये अनेक देशांच्या राज्यकर्त्यांचा अंत मोठ्या विचित्र परिस्थितींमध्ये झाला असल्याचा उल्लेख आहे. या दुर्दैवी घटनांमध्ये थायलंडची राणी सुनंदा कुमारीरतना हिच्या अंताची कहाणी दुर्दैवीच नाही, तर स्तिमितही करणारी आहे. सयाम (आधुनिक काळातील थायलंड)चे राजे चुलालोंगकोर्न यांच्या अधिपात्याखाली सयाम मध्ये वैचारिक आणि सामाजिक परिवर्तन मोठ्या प्रमाणावर घडून आले. यांच्याच अधिपत्याखाली सयाममध्ये गुलामगिरीवर कायद्याने बंदी आणण्यात आली. अशा या उदारमतवादी राजाच्या तीन पत्नींपैकी राणी सुनंदा पहिली पत्नी होती. राजे चुलालोंगकोर्न आणि सुनंदाला एक मुलगी असून, ज्यावेळी सुनंदाचा मृत्यू झाला तेव्हा दुसऱ्या वेळी गर्भवती होती.
thailand1
१८८० सालच्या मे महिन्यामध्ये केवळ एकोणीस वर्षे वयाची सुनंदा आपली दोन वर्षाची कन्या राजकुमारी कर्णभोर्न बेजररतना हिच्या समवेत बँकॉकच्या नजीक असलेल्या बांग-पा-इन या आपल्या शाही निवासस्थानी जाण्यास निघाली होती. तिच्यासमवेत काही सैनिक आणि काही सेवकांचा ताफा ही होता. बांग-पा-इन येथे पोहोचण्यासाठी चाओ फ्राया ही सयाममधील सर्वात मोठी नदी ओलांडावी लागत असे. ही नदी ओलांडण्यासाठी सुनंदा आपल्या मुलीसमवेत एका लहानशा नावेमध्ये जाऊन बसली, आणि एक मोठी बोट या नावेला खेचून पैलतीरी घेऊन जाऊ लागली. मात्र नदी ओलांडत असताना पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने अचानक सुनंदा आणि राजकुमारी बसलेली नाव पाण्यात उलटली आणि बुडू लागली. पाण्यात बुडणाऱ्या नावेबरोबर सुनंदा आणि राजकुमारीदेखील पाण्यामध्ये बुडू लागल्या. मात्र दुसऱ्या बोटीवरून सर्व प्रकार पाहणाऱ्या सैनिकांनी आणि सेवकांनी या दोघींना वाचविण्यासाठी कोणतीच हालचाल केली नाही. सुनंदा आणि राजकुमारी पाण्यात बुडताना इतर सर्वजण केवळ जे घडत होते ते स्तब्धपणे पहात राहिले!
thailand2
सुनंदा आणि राजकुमारीची मदत सैनिकांनी आणि इतर सेवकांनी का केली नसेल, याचे उत्तर सयाममध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या कायद्यामध्ये होते. कोणत्याही सामान्य मनुष्याने शाही परिवारातील कोणत्याही सदस्याला स्पर्श करता कामा नये असे सांगणारा हा कायदा होता. जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करील, त्याला देहदंडाची शिक्षा फर्माविण्यात येत असे. त्यामुळे राणी सुनंदा आणि राजकुमारी पाण्यामध्ये बुडताना पाहूनही केवळ या कायद्याच्या भीतीपोटी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न कोणीही करू धजावले नाही. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये बुडणाऱ्या मनुष्याला वाचविल्याने पाण्यामध्ये निवास करीत असलेल्या शक्तीचा कोप होतो अशी आणखी एक अंधश्रद्धा त्या काळी रूढ असल्याने या कायदे आणि रूढी-परंपरा यांच्यामध्ये गुरफटलेले सैनिक आणि सेवकवर्ग तटस्थपणे काय घडते आहे ते नुसतेच पहात राहिले, आणि त्यापायी दोन निष्पाप जीवांचा मात्र दुर्दैवी अंत झाला.
thailand3
ही घटना जेव्हा राजे चुलालोंगकोर्न यांना समजली, तेव्हा राणी आणि राजकुमारीला वेळेत वाचविण्याची आज्ञा न दिल्याने राणीच्या प्रमुख सहायकाला राजाने तुरुंगवासाची शिक्षा फर्माविली. राणी व राजकुमारीच्या मृत्यूने राजा अतिशय कष्टी झाला. सुनंदा, राजाची आवडती राणी असल्याने तिच्या अंत्यविधीसाठी राजाने भरपूर संपत्ती खर्च केली. ज्या शाही निवासस्थानाकडे जात असताना राणीचा अपघाती मृत्यू झाला त्या राजनिवासामध्ये राजाने राणी सुनंदाची समाधीही बनवविली. आजही ही समाधी राणीचा आणि राजकुमारीचा मृत्यू, आपण कल्पनाही करू शकत नाही अशा विचित्र परिस्थितीमध्ये कशाप्रकारे झाला याची आठवण करून देते.

Leave a Comment