सतत दोन महिने अंधाराच्या साम्राज्याखाली असलेले ‘नोरील्स्क’

black
रशियातील सर्वात थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबेरिया प्रांतातील नोरील्स्क शहरामध्ये वर्षातील दोन महिने अंधाराचे साम्राज्य असते. हे शहर जगातील सर्वात नीचांकी तापमान असलेल्या शहरांपैकी एक आहे. प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांच्या अनुसार हिवाळ्यात या ठिकाणचे तापमान -६१ अंशांच्याही खाली असते. तसेच इतर वेळी देखील सामान्यपणे या ठिकाणचे तापमान कायम -१० अंश इतकेच असते. नोरील्स्क शहराचा मुख्य ऋतू हिवाळाच म्हणावा लागेल. वर्षातील बारा महिन्यांपैकी तब्बल नऊ महिने हे शहर बर्फाच्या शुभ्र चादरीखाली दडलेले असते.
येथे राहणाऱ्या लोकांना दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हिमवादळांना तोंड द्यावे लागत असते. ऐन हिवाळ्याच्या मोसमामध्ये, म्हणजे डिसेम्बर आणि जानेवारीच्या महिन्यांमध्ये तापमान खाली घसरतेच, पण त्याशिवाय या दोन महिन्यांच्या काळामध्ये या शहरामध्ये अंधाराचे साम्राज्य असते. या काळामध्ये सतत बर्फवृष्टी होत असल्याने सूर्याचे दर्शन अजिबातच होत नाही. त्यामुळे दिवस उगविला कधी आणि मावळला कधी याचा पत्ताच येथे लागत नाही.
black1
नोरील्स्क शहर रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को शहरापासून तब्बल तीन हजार किलोमीटर्सच्या अंतरावर वसलेले आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी केवळ विमाने किंवा प्रवासी बोटींच्या सहाय्याने यावे लागते. पण या शहरातील नागरिकांसाठी सर्व सोयी शहरामधेच उपलब्ध असून, त्यामुळे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नागरिकांना अडचण होत नाही. या शहरामध्ये नागरिकांच्या मनोरंजनसाठी अनेक रेस्टॉरंट, कॅफे, सिनेमागृहे, तसेच अनेक प्रार्थनाघरेही उपलब्ध आहेत.
black2
नोरील्स्क शहराचे हवामान जरी टोकाचे म्हणण्यात येत असले, तरी या शहराचा लौकिक रशियातील सर्वात संपन्न शहर म्हणून आहे. याचे मुख्य कारण हे, की प्लॅटीनम, पॅलेडियम, आणि निकेल धातूंचे जगातील सर्वात मोठे साठे या शहरामध्ये आहेत. हे शहर केवळ जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकीच एक नाही, तर जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी देखील एक आहे. या ठिकाणी ‘रीफाईनिंग’ ( धातूंचे शुद्धीकरण ) आणि ‘मायनिंग’ ( खाणींमधून धातू खोदून काढणे) यांचे काम मोठ्या प्रमाणवर होत असल्याने या प्रक्रियांच्या द्वारे सल्फर डाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणावर बाहेर टाकले जात असते. येथील हवेमध्ये सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण इतके जास्त आहे, की या खाणींपासून तीस किलोमीटरच्या परिसरामध्ये असलेली सर्व वृक्षराजी संपुष्टात आली आहे. तसेच या परिसरातील झाडांपासून मिळणारा कोणताही पदार्थ खाल्ला जाण्याला मनाई आहे.

Leave a Comment