पावभाजी हा पदार्थ हा आताच्या काळामध्ये केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरातच अतिशय लोकप्रिय आहे. अतिशय चविष्ट, सहसा सर्वांनाच आवडणारा आणि पोटभरीचा हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाल्ला जाऊ शकतो. गरमागरम, मसालेदार भाजी आणि त्यासोबत गरमागरम, लुसलुशीत, लोण्यावर शेकलेला पाव डोळ्यांसमोर पाहूनच मन तृप्त होते. आताच्या काळामध्ये पाव भाजीमध्ये देखील पुष्कळ विविधता पहावयास मिळते. ‘चीझ/पनीर पावभाजी’, जी मंडळी कांदा-लसूण खात नाहीत त्यांच्याकरिता ‘जैन पावभाजी’, आणि अगदी बच्चे कंपनीला देखील आवडीने खाता यावी या करीता कमी मसाले वापरून बनविलेली ‘मुन्ना पावभाजी’ असे पावभाजीचे अनेक प्रकार लोकप्रिय आहेत.
(व्हिडीओ सौजन्य – Busy Bee Kitchen)
अलीकडच्या काळामध्ये पावभाजीच्या व्हरायटीच्या यादीमध्ये आणखी एका प्रकारच्या पावभाजीचा समावेश झाला आहे, आणि हा प्रकार झपाट्याने लोकप्रियही होत आहे. हा प्रकार म्हणजे ‘कार्बन पावभाजी’. यालाच ‘ब्लॅक पावभाजी’ असेही म्हटले जाते. या भाजीचा रंग काळसर दिसत असल्याने याला कार्बन किंवा ब्लॅक पावभाजी म्हटले जाते. ही भाजी काळसर दिसावी या करिता पावभाजी मसाला आणि इतर मसाल्यांच्या खेरीज आणखी एक विशिष्ट मसाला या भाजीमध्ये वापरला जातो. याच मसाल्यामुळे या भाजीला काळा रंग येतो. साधारण चार जणांना पुरेल इतपत भाजीसाठी लागणारा काळा मसाला बनविण्यासाठी सुक्या खोबऱ्याचा एक मोठा तुकडा, एक मसाल्याची वेलची, एक जावित्री, दोन दालचिनीचे तुकडे, ३ लवंगा, दगडफूल, एक चमचा बडीशेप, एक मोठा चमचा किसलेले सुके खोबरे, आणि दोन तमालपत्रे इतक्या साहित्याची आवश्यकता आहे.
सुक्या खोबऱ्याचा तुकडा सोडल्यास बाकी सर्व साहित्य कढईमध्ये कोरडे भाजून घ्यावेत. सुक्या खोबऱ्याचा तुकडा कढईमध्ये न भाजता थेट मध्यम आचेवर, काळा होईपर्यंत भाजून घ्यावा. त्यानंतर काळसर झालेल्या या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यावे आणि इतर साहित्यासोबत मिक्सरवर बारीक वाटावे. अशा प्रकारे तयार झालेला हा काळा मसाला पावभाजीमध्ये इतर मसाल्यांसोबत घातला असता, भाजीला काळा रंग येतो. बाकी भाजी बनविण्याचे साहित्य आणि पद्धत नेहमीप्रमाणेच आहे.