जाणून घेऊ या देवी शाकुंभरी मंदिराचे महत्व

Shakumbhari
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाकुंभरी मंदिरामध्ये साग्रसंगीत पूजन केल्यानंतर निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. हे मंदिर दुर्गेचे शक्तीपीठ असून, या देवीची उपासना करणाऱ्याच्या घरामध्ये सदैव सुख-समृद्धी आणि संपन्नता नांदत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या देवस्थानाशी निगडित आख्यायिका अशी, की दुर्गम नावाच्या दैत्याने ब्रह्माची उपासना करून ब्रह्माला प्रसन्न करून घेतले. ब्रह्माने त्याला चारही वेदांचे ज्ञान वरदान म्हणून दिले. त्याचबरोबर युद्धामध्ये कायम ‘अजेय’ राहण्याचे, म्हणजेच कुणाकडूनही पराभूत न होण्याचे वरदानही दुर्गमाला प्राप्त झाले. हे वरदान प्राप्त झाल्यानंतर दुर्गमाचे वर्तन अतिशय क्रूर बनले. त्याच्या राज्यामध्ये भयंकर दुष्काळ पडला, आणि त्यापायी लोक मृत्युमुखी पडू लागले. तरीही दुर्गमाचे अत्याचार कमी होत नव्हते. हे पाहून सर्व देवता दुर्गेला शरण गेले आणि तिने दुर्गमाचा संहार करावा अशी विनंती त्यांनी दुर्गेला केली. त्यानंतर दुर्गा शाकुंभरीच्या रूपात अवतरली. शाकुंभरीला सहस्र नेत्र होते. या नेत्रांमधून अश्रूंच्या हजारो धारा वाहण्यास सुरुवात झाली. या धारांमुळे दुर्गमाचा अंत झाल्याची आख्यायिका आहे.
Shakumbhari1
श्री दुर्गा सप्तशतीच्या अकराव्या अध्यायामध्ये शाकुंभरी देवीचे वर्णन आहे. आपल्या सहस्र नेत्रांनी आपल्या प्रजेकडे प्रेमळ कृपादृष्टीने पाहणारी ही देवी असल्याने हिला शताक्षीही म्हटले जाते. एकदा भयंकर दुष्काळ पडला असता देवीने आपल्या शरीरातून उत्पन्न केलेल्या ‘शाका’तून, म्हणजेच धान्य-भाजीपाल्यातून आपल्या प्रजेचे पालन केले असल्याची मान्यता असल्यानेही या देवीला शाकुंभरी देवी म्हटले जाते.
Shakumbhari2
या देवीच्या दर्शनाला येण्यापूर्वी बाबा भूरादेव मंदिरामध्ये भाविक दर्शनाला येतात. भूरादेव भगवती दुर्गेचे परमभक्त होते. पृथ्वीतलावरून दैत्यांचा समूळ नाश करण्याचा विडा भुरादेवांनी उचलला असता त्यांच्या साहसाने भगवती प्रसन्न झाली आणि देवीच्या दर्शनाला येण्याआधी भूरादेवांचे दर्शन घेतल्याखेरीज देवीचे दर्शन फळणार नाही असा आशीर्वाद देवीने भूरादेवांना दिला. त्यामुळे शाकुंभरी देवीच्या दर्शनाला येण्यापूर्वी बाबा भुरादेवांचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे.

Leave a Comment