एका चुकीच्या निर्णयामुळे या कंपन्या झाल्या नामशेष

company
व्यवसायामध्ये अचूक निर्णय घेण्याची क्षमता आणि त्याला आवश्यक असलेले ज्ञान आणि अनुभव या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरत असतात. अनेक नावारूपाला आलेले व्यवसाय केवळ एका चुकीच्या निर्णयामुळे नामशेष झाल्याची किंवा नुकसानीत गेल्याची अनेक उदाहरणे जगभरात आहेत. गुगलचे ‘जी-मेल’ अस्तिवात येण्याआधी ‘याहू’ हे इमेलचे लोकप्रिय माध्यम होते. मात्र ‘याहू’ने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे एके काळी इमेलचे इतके प्रभावी असलेले हे माध्यम आजच्या काळामध्ये जवळजवळ कालबाह्य झाले आहे. १९९८ साली गुगलच्या वतीने ‘याहू’कडे त्यांची ‘पेजरँक सिस्टम’ विकत घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासाठी गुगलच्या वतीने ‘याहू’ला एक मिलियन डॉलर्सची रक्कमही देऊ करण्यात आली होती. मात्र ‘याहू’ला स्वतःचा वेगळा ‘प्लॅटफॉर्म’ असावा अशी इच्छा असल्याने त्यांच्यावतीने गुगलचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. २००२ साली गुगलने आणखी एक प्रस्ताव ‘याहू’ समोर ठेवला. त्याकाळी गुगलला आपल्या कंपनीसाठी पाच मिलियन डॉलर्सची आवश्यकता होती. त्याबदल्यात गुगलमध्ये ‘याहू’ला शेअर्स देण्यात येणार होते. त्या काळी जर गुगलचा हा प्रस्ताव स्वीकार करून ‘याहू’ने त्यांना पाच मिलियन डॉलर्स दिले असते, तर आजच्या काळामध्ये गुगलमध्ये ‘याहू’चा वाटा पुष्कळ मोठा असता. मात्र ‘याहू’चे तत्कलीन मुख्य असलेल्या टेरी सेमेल यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला होता.
company1
१९६०च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये ‘श्लिट्झ’ बियर अतिशय लोकप्रिय होती. जोसेफ श्लिट्झ ब्रुइन्ग कंपनीने ही बियर बाजारामध्ये आणली होती. ही बियर अतिशय लोकप्रिय ठरली असून याला सर्व अमेरिकेमध्ये मोठी मागणी होती. मात्र १९६७ साली या कंपनीचे चेअरमन असलेले रॉबर्ट उहलाईन यांनी बियर बनविण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने बियर बनविण्याची संपूर्ण प्रक्रियाच बदलली जाण्याचा निर्णय घेतला. आधीच्या प्रक्रियेनुसार बियर नैसर्गिक रित्या आंबवली जात असे. मात्र ही प्रक्रिया नाकरून उहलाईन यांनी उच्च तापमानामधे बियर कृत्रिम रित्या
आंबविण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आणखी एक नवा प्लांट उभा केला, आणि तिथे ही प्रक्रिया सुरु करण्यात आली. जुन्या प्रक्रियेद्वारे बियर बनविली जात असताना त्यामध्ये ‘मॉल्टेड बार्ली’ वापरली जात असे. नव्या प्रक्रियेमध्ये मात्र या ऐवजी कॉर्न सिरपचा वापर केला जाऊ लागला. तसेच बियरमध्ये आधी वापरले जाणारे सर्व अर्क बदलून त्याऐवजी कमी दर्जाचे अर्क वापरले जाऊ लागले. या सर्वाचा परिणाम इतकाच झाला, की पूर्वी ज्या उत्तम स्वादासाठी ही बियर मुळात लोकप्रिय होती, तो स्वादच नव्या प्रक्रियेने बनविलेल्या बियरमधून गायब झाला. त्याचबरोबर ही बियर आधीच्या बियरच्या मानाने लवकर खराबही होऊ लागली. त्यानंतर मात्र या बियरची लोकप्रियता अर्थातच ढळत गेली.

Leave a Comment