या देशांमध्ये विशिष्ट पेहराव असणे बंधनकारक

dress-code
आजकालच्या प्रगत युगामध्ये सातत्याने कोणती गोष्ट बदलत असेल, तर ती म्हणजे कपड्यांची फॅशन. दररोज जगभरामध्ये नित्यनव्या फॅशन ट्रेंड्स अस्तित्वात येत असतात. एके काळी कपड्यांची फॅशन स्त्रियांच्या बाबतीत जास्त महत्वाची मानली जात असली, तरी आता नवनव्या फॅशन ट्रेंड्समध्ये महिलांच्या सोबत पुरुष आणि लहान मुलांचे पेहरावही मोठ्या प्रमाणावर समाविष्ट होत असतात. फॅशन ही केवळ कपड्यांपुरती मर्यादित नसून, यामध्ये पेहरावाच्या सोबत त्याला साजेशा पर्स, दागिने, स्कार्फ, पादत्राणे, इत्यादी अॅक्सेसरीजसोबतच केशभूषा आणि प्रसाधनाचा ही समावेश असून, अद्ययावत फॅशनबरहुकुम आपला पेहराव असावा असा सर्वांचाच प्रयत्न असतो. पण या फॅशन ट्रेंड्सकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत काही देशांमध्ये मात्र पेहराव कसा असावा हे सांगणारे काही कडक नियम अस्तित्वात आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर गाम्बिया देशाचे देता येईल. या देशामध्ये सर्व सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी केस मोकळे न सोडता व्यवस्थित बांधलेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे. पेहरावाच्या संबंधी अशाच अनेक नियमांचे पालन करणे काही देशांमध्ये बंधनकारक आहे.
dress-code1
उत्तर कोरिया मध्ये पुरुषांच्या केशभूषा कशा असाव्यात या संबंधीचे कायदे कडक आहेत. या कायद्याच्या अनुसार पुरुषांसाठी काही ठराविक केशभूषांना शासनाने मान्यता दिली असून, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे केस कापून घेण्याला येथे संमती नाही. तसेच पुरुषांच्या केसांची लांबी दीड सेंटीमीटरपेक्षा जास्त नसून, दर पंधरा दिवसांनी केस कापणे बंधनकारक आहे. उत्तर कोरियन महिलांना ट्राऊझर्स, म्हणजेच पँट्स घालण्यास अनुमती नाही. महिलांनी ट्राऊझर्स परिधान करणे हा या देशामध्ये अपराध असून, यासाठी अनेक महिलांना दंड ही केला गेला आहे. सुडान देशामध्येही महिलांना ट्राऊझर्स घालण्यास मनाई असून, २०१४ साली पाश्चात्य पद्धतीच्या ‘स्लॅक्स’ परिधान केलेल्या काही महिलांना प्रत्येकी चाळीस फटके मारले जाण्याची शिक्षा सुनाविली गेली असता केवळ सुडानमधेच नाही, तर संपूर्ण जगभरातच खळबळ माजली होती. या देशातील महिलांना आखूड पोशाख परिधान करण्याचीही मुभा नाही, तर पुरुषांनी कोणत्याही प्रकारचे प्रसाधन करण्यास या देशामध्ये मनाई आहे. २०१० साली एका फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या पुरुषांनी प्रसाधन केल्यानिमित्त त्यांना जबर दंड करण्यात आला होता.
dress-code2
सौदी अरेबिया देशामध्ये महिलांनी कोणत्याही प्रकारे जरासुद्धा अंगप्रदर्शन करणे कायद्याने मना असून, या देशातील महिला नागरिकांनी डोक्यावर नकाब आणि अबाया, म्हणजेच पायघोळ बुरखा घालणे बंधनकारक आहे. पेहराव कसा असावा याचे नियम महिलांप्रमाणे पुरुषांनाही लागू आहेत. २००७ साली रियाध येथे एका खासगी पार्टीमध्ये ६७ पुरुषांना त्यांनी महिलांप्रमाणे पेहराव (cross dressing) केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या उलट फ्रांस देशामध्ये मात्र २०१० सालपासून नकाब आणि बुराख्यावर बंदी घालण्यात आली असून, कपड्याने किनव इतर कोणत्याही प्रकारे चेहरा झाकलेला असण्याला येथे कायद्याने मनाई आहे. या कायद्यावर अनेक मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला असला, तरी युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राईट्सने फ्रांस सरकारच्या या कायद्याला पाठींबा दिला असून, एकमेकांचे चेहरे न पाहता एकत्र गुण्यागोविंदाने राहणे शक्य नसल्याचे सांगून या कायद्याला संमती दिली आहे.
dress-code3
युगांडा देशामध्ये महिलांना गुडघ्याच्या वर आखूड पोशाख घालण्याला मनाई आहे. हा कायदा युगांडा सरकारच्या ‘अँटी पोर्नोग्राफिक बिल’चा भाग असून, अशा प्रकारचे पोशाख परिधान करणाऱ्या महिलांना समाजाचा उपरोध आणि क्वचित प्रसंगी मारहाणही सहन करावी लागली आहे. या कायद्याच्या विरोधात आंदोलने केली गेल्यानंतर या देशाच्या पंत प्रधानांनी या कायद्यावर पुनर्विचार केला जाण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment