कार्यकर्ता की वारसा – भाजपपुढील पेच

narendra-modi
एखाद्या नवख्या उमेदवारामुळे लोकसभा निवडणुकीची लढत रंजक व्हावी आणि निकालापूर्वीच संपूर्ण देशाचे लक्ष तिकडे वेधले जावे, असे क्वचितच घडते. मात्र यंदा हे अघटित होत आहे ते कर्नाटकातील एका जागेवरून. बेंगळूर दक्षिण या प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने एका तरण्याबांड कार्यकर्त्यावर बाजी लावली आहे. या प्रक्रियेत राजकीय वारशाची उपेक्षा होत असल्यामुळे पक्षात गोंधळ निर्माण झाला आहे. या पेचातून मार्ग काढण्यात पक्षनेतृत्वाचा कस लागणार आहे.

कर्नाटकात पहिल्या टप्प्यात दक्षिण कर्नाटक भागातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी सोमवारी रात्री उशिरा उमेदवारांची घोषणा करण्यात आली. बेंगळूर दक्षिणमधून दिवंगत केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या पत्नी तेजस्विनी अनंतकुमार यांना तिकीट मिळेल अशी चर्चा असतानाच अचानक तेजस्वी सूर्या नावाच्या एका नवख्या तरुणाला संधी देण्यात आली. त्यामुळे अनंतकुमार यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची लाट उसळली. सूर्या यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा अनेक मोठे नेते त्यांच्या रॅलीत सहभागी झाले नाहीत.

अनंतकुमार हे भाजपचे तगडे नेते होते. सहा वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या अनंतकुमार यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांना भाजप वरिष्ठांनी तिकीट द्यावे, अशी साहजिकच अनंतकुमार यांच्या समर्थकांची भावना होती. राज्य भाजपची कार्यकारिणीही त्याला अनुकूल होती. इतकेच नव्हे तर आपली उमेदवारी गृहित धरून तेजस्विनी यांनी निवडणूक प्रचार सुरूही केला होता. सहानुभूतीच्या आधारे आपल्याला विजय मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी मठ-मंदिरांना भेटीही दिल्या होत्या. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांतच्या सभा तसेच वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या होत्या.

मात्र ऐनवेळी त्यांच्या ऐवजी सूर्या यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने राज्य भाजपची शिफारस डावलून तेजस्वी सूर्या यांच्या पारड्यात वजन टाकले. भाजपच्या राष्ट्रीय समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ही निवड केल्याचे सांगितले जाते. आता तेजस्वी सूर्या यांचा सामना काँग्रेसचे प्रभावी नेते बी. के. हरिप्रसाद यांच्याशी होणार आहे.

तेजस्वी सूर्या हे बेंगळूरच्या बसवणगुडीचे भाजप आमदार रवी सुब्रह्मण्य यांचे पुतणे आहेत. ते रा. स्व. संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. व्यवसायाने वकील असलेल्या सूर्या यांनी बंगळुरूतील इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीज येथे शिक्षण घेतले आहे. सध्या ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आणि राष्ट्रीय सोशल मीडिया टीमचे सदस्य आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत नमो ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी भाजप हायकमांडवर आपली छाप उमटवली होती. उत्तम वक्तृत्व कौशल्यामुळे ते युवक कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत.

मात्र सूर्या यांची उमेदवारी मंगळवारी पहाटे दोन वाजून 48 मिनिटांनी झाली तेव्हा राज्यातील अनेक भाजप नेते बुचकळ्यात पडले. राज्यी भाजप अध्यतक्ष बी. एस. येडियुरप्पा् यांनीही आपले आश्चर्य लपवले नाही. ‘आम्ही केवळ एक नाव तेजस्विनी यांचे पाठवले होते. मात्र पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वापने वेगळा दृष्टिकोन बाळगला. आम्ही पक्षाच्या आदेशानुसार काम करू, ‘ असे ते म्हणाले.

स्वतः सूर्या यांनाही कदाचित ही अपेक्षा नसावी. ‘ओएमजी ओएमजी! माझा यावर विश्वास बसत नाही. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान आणि सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यअक्षांनी बंगळुरू दक्षिण जागेवरून माझ्यासारख्या 28 वर्षांच्या मुलाला तिकिट दिले आहे. हे फक्त भाजपमध्ये होऊ शकते. फक्त पीएम मोदी यांच्या नव्या भारतात,’ असे त्यांनी ट्विटरवर लिहिले.

तेजस्विनी यांनीही आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. “अनंतकुमार आणि मी बंगळुरूला आलो तेव्हा येथे पक्षाचे कार्यालयही नव्हते. आम्ही येथे पक्ष उभा केला. पक्षाने मला विश्वासात घ्यायला हवे होते,” असे त्यांनी म्हटले आहे. आपण पक्षातून बंडखोरी करणार नाही, असे त्यांनी सांगितले असले तरी त्यांची नाराजी पक्षाला लक्षात घ्यावी लागणार आहे.

सूर्या यांनाही याची जाणीव आहे. म्हणूनच त्यांनी अनंतकुमार आणि तेजस्विनी यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगितले आहे. अनंतकुमार यांनी मला घडवले, त्यांनीच मला दिशा दाखवली असे ते म्हणाले आहेत.

या प्रत्येकाने आपापली बाजू सावरून घेतली असली, तरी भाजपमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे हे नक्की. शिवाय भाजपचा हा डाव यशस्वी झाला तर त्याचे आगळे महत्त्व असेल. दिवंगत लोकप्रतिनीधीच्या पत्नीला किंवा मुलाला बाजूला सारून नव्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा पायंडा या निवडणुकीमुळे पडेल. म्हणून बंगळुरू दक्षिण मतदारसंघावर नजर ठेवावीच लागणार आहे.

Leave a Comment