असॅटचे यश आणि अमेरिका, चीनची पोटदुखी

asat
भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची (असॅट) यशस्वी चाचणी काय केली, की महाशक्तींच्या भुवया लगेच वर गेल्या. असॅटच्या चाचणीला दाद देतानाच अंतराळातील कचऱ्याबद्दल (स्पेस डेबरी) अमेरिकानेने चिंता व्यक्त केली आहे. तसेच भारताने भलेही यशस्वी चाचणी केली असेल, परंतु अंतराळ सुरक्षा प्रणालीपासून भारत अद्याप दूर आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे. काहीशी अशीच टिप्पणी चीननेही केली आहे. या देशांची ही टीकाटिप्पणी पोटदुखीच्या प्रकारात मोडणारी आहे. कारण “अंतराळात पुढे जाण्यामागे आमचा हेतू कोणालाही भय दाखवण्याचा नाही तर आम्हाला कोणी भय दाखवू शकणार नाही अशी व्यवस्था ऊभी करणे हा आहे,” असे भारताने स्पष्ट केले आहे.

भारत एवढी मोठी मजल मारू शकणार नाही, असे पाश्चिमात्य देशांसहित अनेक देशांना असे वाटत होते. परंतु भारतीय शास्त्रज्ञांनी हे अशक्य शक्य करून दाखवले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयांसहित विविध संस्थांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या प्रयोगांमुळे अंतराळात कचरा वाढेल, असे त्यांचे म्हणणे आहे. पृथ्वीवासीयांनी एकत्र येऊन अंतराळाचा उपयोग शांतिपूर्वक आणि विकासासाठी करायला हवा, असे त्यांचे म्हणणे आहे.

अंतराळातील भंगाराची ही डोकेदुखी पूर्णपणे 1957 नंतर निर्माण झाली आहे. त्यापूर्वी अंतराळात कोणतेही भंगार नव्हते कारण अंतराळात उपग्रह पाठवणे, रॉकेट पाठवणे, विविध प्रयोग करणे असा काही प्रकारच नव्हता. अमेरिका व सोव्हिएत संघातील स्पर्धेमुळे हे प्रयोग सुरू झाले. सोव्हियत रशियाने 1957 साली ‘स्पुटनिक’ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडला होता. तेव्हापासून हा कचरा जमा झाला आहे. सध्या अंतराळात 10 कोटी कचऱ्याचे तुकडे असल्याचा अंदाज आहे. त्यातील 35 टक्क्यांपेक्षा अधिक भंगार एकट्या रशियाने निर्माण केलेले आहे. भारताला शहाजोग सल्ला देणाऱ्या अमेरिकेनेही यातील 30 टक्के भंगाराला हातभार लावला आहे. चीनने 2007 मध्ये अशीच चाचणी करून उपग्रह पाडला होता तो 900 किलोमीटरवरील कक्षेत होता. तोही असाच हजारो तुकड्यांमध्ये पसरला होता. त्यावेळी अमेरिकेला अंतराळाच्या स्वच्छतेची चिंता नव्हती, आता भारताची चाचणी यशस्वी झाल्यावर निर्माण झाली आहे.

दुसरीकडे अंतराळ मिशन आणि अंतराळ संशोधनात वाढ होत असून नवनवीन देश त्यात सामील होत आहेत. यात जुने उपग्रह, उपकरण आणि रॉकेटचे भाग यांचा समावेश आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हे भंगार 500 किलोमीटरपासून 36 हजार किलोमीटरपर्यंतच्या कक्षेत पसरले आहे. भ्रमणकक्षेत असल्यामुळे हे भंगार उपग्रहासारखेच फिरत असते, मात्र त्याची ही फिरण्याची गती तासाला 28 ते 29 हजार किलोमीटर एवढी प्रचंड असते. या वेगाने एखादा छोटा कणही एखाद्या उपग्रह, अंतराळ यान किंवा अंतराळ प्रवाशाला धडकला तर मोठी हानी होऊ शकते. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या दळवळणाच्या उपग्रहांना त्यामुळे भयंकर अपघात किंवा हानी होऊ शकते.

अमेरिकेसारख्या देशाने यावर उपाय म्हणून स्पेस ट्रॅकिंग सिस्टम बसवली आहे. एका विशिष्ट आकारापेक्षा मोठ्या आकाराच्या वस्तूंवर ही यंत्रणा लक्ष ठेऊन असते. या प्रणालीमुळेच भारताच्या असॅट चाचणीमुळे अंतराळात 250 पेक्षा जास्त तुकडे पसरले आहेत, हे अमेरिकेला कळाले.

अंतराळातील हा कचरा काढण्याबाबत जगभरातील अनेक शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून विविध उपाय सुचवत आले आहे. त्यावर कोणताही रामबाण इलाज अद्याप सापडलेला नाही. विविध उपग्रहांमध्ये होणारे स्फोट धडका आणि उपग्रहविरोधी हत्यारांच्या चाचण्यांमुळे ही समस्या आणखी गंभीर बनली आहे. अंतराळातील हा कचरा काढण्यासाठी आणि त्यांची निर्मिती कमी करण्यासाठी जपानने तीन वर्षांपूर्वी एक यान सोडले होते. या यानाला अर्धा मैल म्हणजेच 700 मीटर लांब शेपटी जोडलेली असून ती अॅल्युमिनियमचे तुकडे आणि स्टीलच्या तारांनी बनविलेली होती. मात्र या जपानी योजनेचा परिणाम केवळ कचऱ्याच्या मोठ्या तुकड्यांवर होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

वास्तविक अंतराळात अनेक निकामी उपग्रह, रॉकेटचे साहित्य आणि इतर कचरा फिरत आहे. भारताने हाणून पाडलेल्या उपग्रहाचा राडारोडा त्यात नक्कीच वाढला असणार. पण म्हणून भारताच्या या उपग्रहाच्या कचऱ्याने काही आकाश कोसळणार नाही. कारण हा निकामी उपग्रह पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर फिरत आहे. पृथ्वीपासून एवढ्या अंतरावरील हे भंगार 45 दिवसांमध्ये कोसळेल आणि पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच जळून जाईल. त्यामुळे ‘स्वच्छ अंतराळा’चा हा अमेरिका-चीनचा आग्रह निव्वळ पोटदुखी आहे, दुसरे काही नाही!

Leave a Comment