महामानवाच्या भूमिकेत दिसणार सागर देशमुख

sagar-deshmukh
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. आपल्या देशाच्या इतिहासातील त्यांचे जीवनचरित्र हे एकमहान पर्व आहे. आता याच महामानवाचे स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’या मालिकेतून इतिहासाचे हे सोनेरी पान पुन्हा उलगडले जाणार आहे. समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण आणि राजकारण याविषयी आंबेडकरांनी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. आजही त्यांचे कार्य तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते. देशभरात महामानवाचे हेच विचार पोहोचवण्याच्या हेतूने या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.

या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका अभिनेता सागर देशमुख साकारणार आहे. याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून सागरला प्रेक्षकांनी पाहिले आहे. सागर देशमुख या भूमिकेविषयी सांगताना म्हणाले, माझ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणे नवे आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचे कर्तुत्व खरच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने नव्याने आंबेडकर उलगडत आहोत. मी एक अभिनेता म्हणून श्रीमंत होतो आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. या मालिकेतून महामानवाचे हे महानकार्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ही मालिका येत्या १५ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment