जयाप्रदांचे नायक व खलनायक

jayaprada
हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांतील चर्चित अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षात येताच त्यांना उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून उमेदवारीही बहाल करण्यात आली. तेथे त्यांचा सामना माजी पक्षाचे नेते आझम खान यांच्या विरोधात असणार आहे. त्यांच्या नावावर विविध भाषांमध्ये जवळपास 300हून अधिक चित्रपट आहेत. मात्र चित्रपटांतील भूमिकांपेक्षाही अधिक वेगाने राजकीय पक्ष बदलून त्यांनी नवाच विक्रम रचला आहे.

ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटावर श्रीदेव आणि जयाप्रदा यांचे अधिराज्य होते. त्यावेळी त्यांच्यातील स्पर्धा ही चर्चेचा विषय असायची. मात्र 1990 नंतर दोघींचेही मार्केट डाऊन झाले. मग श्रीदेवीने बोनी कपूरशी घरोबा करून संसार थाटला, तर जयाप्रदा यांनी राजकारणाचा रस्ता धरला. तत्पूर्वी 1986 साली त्यांचा श्रीकांत नाहटा यांच्याशी विवाह झाला होता. आधी लग्न झालेल्या व्यक्तीशी दुसरा विवाह करणे ही या दोन्ही अभिनेत्रींमधील समानता होती.

जयाप्रदा यांचे मूळ नाव ललिता राणी. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री जिल्ह्यात झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी रूपेरी पडद्यावर प्रवेश केला. त्यावेळी त्यांना केवळ 10 रुपयांचे मानधन मिळाले होते. चित्रपट जगतात त्यांना 39 वर्षे झाली असून हिंदीशिवाय तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि अगदी मराठी भाषेतही त्यांनी काम केले आहे.

राजकारणात प्रवेश केलेल्या अभिनेत्री काही कमी नाहीत. मात्र पडद्यावरील आपल्या बहुतेक नायकांना राजकारणात साथ देण्याची जी संधी जयाप्रदांना मिळाली, तशी क्वचितच कोणाला मिळाली असेल. तेलुगू चित्रपटांतील एन. टी. रामाराव यांनीच त्यांना राजकारणात आणले. त्याशिवाय हिंदीतील अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, धर्मेंद्र अशा त्यांच्या अनेक नायकांनी राजकारणात छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. इतकेच नव्हे तर तमिळमधील त्यांची जोडी जमलेल्या रजनीकांत आणि कमल हासन या दोन अभिनेत्यांनीही आता राजकारणात उडी घेतली आहे. जीतेंद्रचा अपवाद वगळता त्यांचे बहुतेक सर्व नायक पडद्यापाठोपाठ राजकारणातही आले आहेत.

आपले एकेकाळचे नायक एन. टी. रामाराव यांच्या तेलुगू देसम पक्षातून जयाप्रदा यांनी राजकीय कारकीर्दीला 1994 साली सुरुवात केली. मात्र 1995 साली चंद्राबाबू नायडू यांनी सासरे रामाराव यांच्या विरोधात बंड करून तेलुगु देसम पक्ष ताब्यात घेतला. तेव्हा नायडूंसोबत मतभेद झाल्यामुळे पक्षाला रामराम ठोकत त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्याचे फळ म्हणून 2004 आणि 2009 मध्ये त्यांना सपातर्फे खासदारपद मिळाले.

मात्र सपातही भाऊबंदकी माजली तेव्हा त्यांना तेथूनही बाहेर पडावे लागले. वादग्रस्त नेते अमरसिंह यांच्याशी त्यांची जवळीक असल्याचे निमित्त झाले आणि अमरसिंह यांच्यासह त्यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी झाली. तेव्हा 2014 मध्ये जयाप्रदा यांनी राष्ट्रीय लोकदल पक्षात प्रवेश केला. आता अमरसिंह यांनीही भाजपची वाट धरली असल्यामुळे जयाप्रदांचीही पावले तिकडेच वळली, तर त्यात नवल नाही.

याच सपात असताना त्यांच्या जीवनात आझम खान यांच्या रूपाने खलनायकाने प्रवेश केला. आता रामपूर मतदारसंघात खान आणि जयाप्रदा यांच्यातील लढत लक्षणीय ठरणार आहे. या मतदारसंघावरून खान व त्यांच्यात 2009 पासून मतभेद आहेत. आझम खान यांनी आतापर्यंत नऊ वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. जयाप्रदा यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही. त्यांच्याविरोधात जाहीर अपशब्द काढण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. त्यावरून सपामधून त्यांची हकालपट्टीही झाली होती.

इतकेच नव्हे तर “आझम खान यांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यांच्यामुळे मी नैराश्यग्रस्त झाले होते,” असेही जयाप्रदा यांनी सांगितले होते.

अमरसिंह यांच्या सांगण्यावरून आझम यांनी 2009 मधील लोकसभा निवडणुकीत जयाप्रदांच्या विजयात हातभार लावला होता. मात्र त्यांच्यात दिलजमाई कधीही झाली नाही. गंमत म्हणजे सध्याचे केंद्रीय मंत्री व जयाप्रदांच्या नव्या पक्षाचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांचे त्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले होते.

जयाप्रदांच्या राजकारण प्रवेशाला यंदा 25 वर्षे पूर्ण होतील. चित्रपटाच्या तीन तासांत ज्या प्रकारे एक कथा पूर्ण होते त्या प्रमाणे या 25 वर्षांत जयाप्रदा यांनी तीन पक्षांचा प्रवेश करून भाजपात प्रवेश केला आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आनंद जयाप्रदा यांनी व्यक्त केला आहे. ‘ज्या पक्षाचे नेतृत्व देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लक्ष घालते, अशा राष्ट्रीय पक्षात मी आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करता येणार आहे, याचा आनंद आहे’ असं जयाप्रदा म्हणाल्या. कोणताही राजकारणी नवीन पक्षात येतो तेव्हा जी प्रतिक्रिया देतो किंवा देते, तशीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांचा हा आशावाद सफल होओ आणि या पक्षात तरी त्यांचे बस्तान बसावे, म्हणजे झाले!

Leave a Comment