प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांच्या दांपत्यजीवनात अडचणी

meghan
गतवर्षी उन्हाळ्यामध्ये ब्रिटीश राजघराण्याचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल यांचा विवाहसोहळा शाही थाटात लंडनमध्ये पार पडला. त्यानंतर काहीच महिन्यांच्या कालावधीनंतर या दाम्पत्याला अपत्य होणार असल्याचे वृत्त आल्याने सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला. त्यानंतर मात्र जसजसा काळ सरत गेला, तशी नव्याची नवलाई संपली आणि या दाम्पत्याला शाही परिवाराचे सदस्य म्हणून अनेक जबाबदाऱ्या उचलाव्या लागल्या. त्यानंतर मात्र हे दाम्पत्य, विशेषतः मेघन मार्कल अनेक कारणांच्या मुळे विवादांत आली असून, त्याचा परिणाम या दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनावरही होत असल्याचे सुप्रसिद्ध लेखिका अॅना पास्टरनॅक यांनी ‘द टेलीग्राफ’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. अॅना यांचा शाही परिवार, त्यातील सदस्य, आणि त्यांच्या इतिहासाचा मोठा अभ्यास असून, त्याबद्दल त्या सातत्याने लिहित असतात.
meghan1
प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांचे स्वभाव एकमेकांपासून अतिशय भिन्न असून त्यामुळे यांच्या नात्यामध्ये असामंजस्य निर्माण झाले असल्याचे अॅना म्हणतात. हॅरी हा ब्रिटीश राजघराण्यातील असून, या परिवारातील सदस्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी कसे वर्तन केले जावे यासंबंधी अनेक अलिखित नियम आहेत. आपल्या भावना, आपली मते सार्वजनिक रित्या व्यक्त करताना कशाप्रकारे केली जावीत याची शिकवण शाही परिवाराच्या सदस्यांना सातत्याने दिली जात असते. म्हणूनच ब्रिटीश शाही परिवारातील सदस्यांच्या पैकी कोणीही कधीही राजनैतिक किंवा संवेदशील विषयांवर खुली मते देताना आढळत नाहीत.
meghan2
या परिवारामध्ये नव्यानेच सहभागी झालेल्या मेघनचे मात्र असे नाही. एक तर मेघन अमेरिकेमध्ये वाढली असल्याने आपला प्रत्येक विचार प्रकट करण्याच्या बाबतीत जास्त आग्रही आहे. तिचा विवाह होऊन थोडाच काळ लोटला असल्याने ब्रिटीश राजघराण्यचे नियम तिच्या फारशा परिचयाचे नाहीत. त्यातून आपणही काही तरी वेगळे करावे, आपली वेगळी ओळख निर्माण करावी अशी मेघनची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जाणते-अजाणतेपणी अनेकदा मेघनचे वर्तन आक्षेपार्ह ठरत असल्याचे अॅन म्हणतात. मेघनने आता आपण हॉलीवूड अभिनेत्री असल्याप्रमाणे वागण्याचे सोडून शाही परिवाराची सदस्य म्हणून आपल्या जीवनशैलीमध्ये यथायोग्य परिवर्तन केले तरच या दाम्पत्याचे जीवन सुखाचे होईल असे अॅन यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment