मुख्यमंत्र्यांच्या नावे लेडीज बार तर पालिका आयुक्तांच्या नावे हुक्का पार्लरची नोंद

combo
मुंबई – बृह्नमुंबई महानगर पालिकेने ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत सुरू केलेल्या ऑनलाइन प्रमाणपत्र प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे. महानगर पालिकेने ऑनलाइन प्रमाणपत्रे पडताळणीविना दिल्याने ‘लेडीज बार अँड रेस्टॉरंट’ची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तर ‘हुक्का पार्लर’चे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या नावे नोंदणी प्रमाणपत्र पालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागाने जारी केले आहेत.
certificate
०२, वर्षा, नेपीअन्सी रोड, मलबार हिल, मुंबई- ४०००२६ अशा पत्याची मुख्यमंत्र्यांच्या ‘लेडीज बार अॅण्ड रेस्टॉरंट’साठी, तर पालिका मुख्यालयातील कार्यालय, दुसरा मजला, महापालिका मार्ग, मुंबई ४००००१ अशा पत्याची नोंद आयुक्तांच्या ‘हुक्का पार्लर’साठी प्रमाणपत्रावर करण्यात आली आहे. तर अनुक्रमे १० व १५ कामगारांची नोंद दोघांच्या नोंदणी प्रमाणपत्रावर करण्यात आली आहे. २४ ऑगस्ट २०१८ ते २३ ऑगस्ट २०१९ या कालावधीसाठी दोघांना ही नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयातून ही प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
certificate1
मुंबई महानगर पालिकेने बांधकाम परवानगीपासून आस्थापनांच्या नोंदणीपर्यंत विविध सुविधा ऑनलाइन सुरू केल्या आहेत. आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र अर्थात गुमास्ता परवान्यांचाही यात समावेश आहे. मात्र, परवाने देण्याची प्रक्रिया सदोष असल्याचे आता दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजोय मेहता यांच्या नावे मिळवण्यात आलेल्या परवान्यांमुळे परवाना देण्यापूर्वी अर्जाची पडताळणीच होत नसल्याचे दिसून येत आहे. पण महानगर पालिकेकडून ही प्रमाणपत्रे वितरित झाली असल्याच्या वृत्ताला महापालिका अधिकारी, डी विभाग यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

Leave a Comment