अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर चीझची भिंत !

cheese
कोसिमो कॅवालारो अमेरिकन ‘चीझ आर्टिस्ट’ आहे. म्हणजेच चीझचा वापर करून निरनिराळ्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य कोसिमोला अवगत आहे. या कुशल कारागिराने आता अतिशय महत्वाकांक्षी निर्मिती हाती घेतली असून, अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांच्या सीमेवर चीझची भिंत बनविण्याचा घाट घातला आहे. ही भिंत साधारण अर्धा किलोमीटर लांबीची असणार असून, कॅलिफोर्नियातील टेकेटमधील वास्तविक सीमेपासून पंचेचाळीस फुटांच्या अंतरावर ही ‘चीझी’ सीमारेषा बनविण्याचा कोसिमोचा मानस आहे.
cheese1
ही भिंत तयार करण्यासाठी कोसिमो ‘कोटीजा’ नामक स्पर्शाला कडक असलेल्या खास मेक्सिकन चीझचा वापर करणार असून, सुरुवातीला दोनशे चीझ ब्लॉक्सच्या मदतीने ही भिंत उभारण्याचे काम सुरु होणार आहे. संपूर्ण भिंत उभी करण्यासाठी सुमारे ८,८०० चीझ ब्लॉक्सची आवश्यकता पडणार असल्याचा कोसिमोचा कयास आहे. अशा प्रकारची चीझची भिंत उभारण्याचा विचार आपल्या मनामध्ये गेली वीस वर्षे घोळत असून, ही कल्पना प्रत्यक्षात कशी उतरवायची हा आपल्यापुढे असलेला प्रश्न असल्याचे कोसिमोने सांगितले. त्यानंतर जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी मेक्सिको आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या मध्ये भिंत उभी करण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा आपली कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा मार्ग आपल्याला सापडला असल्याचे कोसिमोने म्हटले आहे.

सोमवारी या भिंतीची निर्मिती सुरु झाल्यावर त्याचे ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ केले गेले असून, चार ते पाच दिवसांत या भिंतीची निर्मिती पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र ही भिंत टिकून न राहण्याचा किंवा रस्त्यांवरील प्राण्यांनी या भिंतीचा काही भाग खाऊन टाकण्याची शक्यताही कोसिमोने नाकारलेली नाही. पण तरीही आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे ही त्याच्याकरिता महत्वाची आणि समाधानकारक गोष्ट असल्याने चीझची भिंत पुरी करण्याचा त्याने पक्का निर्धार केला आहे.