रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार झाले हे जॅकेट

jacket
आजकालच्या काळामध्ये ‘सस्टेनेबल फॅशन’ म्हणजेच पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता तयार करण्यात येणाऱ्या गोष्टींचे चलन वाढत आहे. चामड्याच्या वस्तू बनविण्यासाठी अनेक निर्मात्यांनी प्राण्यांपासून मिळणाऱ्या चामड्याच्या ऐवजी मशरूम्स, अननस आणि अगदी केळ्यांच्या साली वापरूनही वनस्पतीजन्य चामडे तयार करण्याचे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. आता अशाच एका निर्मात्याने ‘हूडी’ हा जॅकेटचा प्रकार बाजारात आणला असून याची विशेषता अशी, की ही जॅकेट्स कॉफीच्या बियांवरील साले आणि प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांना ‘रीसायकल’ करून बनविण्यात आली आहेत.
jacket1
अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटी या भागातील ‘कोल ट्री’ नामक कंपनीने ही आगळे वेगळे जॅकेट तयार केले आहे. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा अपाय न करता बनविल्या जाणाऱ्या वस्तू, ही या कंपनीची खासियत आहे. या कंपनीने तयार केलेले हे जॅकेट बनविण्यासाठी कंपनीचे कर्मचारी दररोज कामावर येताना वाटेमध्ये जितके कॅफे असतील, तिथून दळलेल्या कॉफीच्या बियांची साले गोळा करून कारखान्यामध्ये आणतात. त्यानंतर कारखान्यामध्ये ही साले वाळवून बारीक केली जातात, आणि प्लास्टिकच्या बाटल्या वितळवून तयार करण्यात आलेल्या द्रवामध्ये ही सालांची पूड मिसळली जाते. या मिश्रणापासून धागा तयार केला जाऊन या धाग्यापासून ही जॅकेट्स तयार करण्यात येतात.
jacket2
प्रत्येक जॅकेट बनविण्यासाठी तीन कप कॉफीच्या बियांची साले आणि दहा प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यात येतो. मात्र हे जॅकेट तयार झाल्यानंतर याला कोणत्याही विशिष्ट प्रकारचा गंध येत नसल्यामुळे कॉफीच्या बियांची साले आणि प्लास्टिकच्या बाटल्या वापरून हे जॅकेट बनविले गेल्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. या जॅकेटला एक कानटोपी आणि लहान वस्तू ठेवण्यासाठी खिसेही देण्यात आले आहेत. हे जॅकेट उबदार असून, हायकिंग, ट्रेकिंग, बोटिंग किंवा सायकलिंग करताना वापरण्यासाठी हे जॅकेट चांगले असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment