आपली ऑफर मान्य करा आणि जेट एअरवेजला वाचवा – विजय माल्ल्या

vijay-mallya
नवी दिल्ली – सरकारी बँकांना पुन्हा एकदा हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय माल्ल्या याने ऑफर दिली आहे. माझ्याकडचे पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर सरकारी बँकांना माल्ल्याने दिली आहे. आर्थिक अडचणीत जेट एअरवेज कंपनी असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा सोमवारी राजीनामा दिला आहे. 1 हजार 500 कोटी रुपयांची मदत कर्जदात्यांकडून मिळावी म्हणून नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनीता गोयल यांनी पद सोडले होते.

दरम्यान, फरार माल्ल्याने आज एकापाठोपाठ एक ट्विट करून जेट एअरवेजला मदत करणाऱ्या सरकारने किंगफिशर एअरलाईन्सला का मदत केली नाही, असा सवाल उपस्थित केला. सरकारी बँका जेट एअरवेज अडचणीत असताना मदतीला धावल्या आहेत. हे चित्र पाहून छान वाटते. पण किंगफिशर एअरलाईन्स अडचणीत असताना हीच मदत का करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारत माल्ल्याने एनडीए सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला.

माल्ल्याने यावेळी बँकांची थकीत रक्कम परत करण्याच्या ऑफरचाही पुनरुच्चार केला. कर्नाटक उच्च न्यायालयासमोर मी माझ्या संपत्तीचे विवरण दिले आहे. सरकारी बँका आणि अन्य कर्जदात्यांचे पैसे त्यातून परत करता येतील. माझे पैसे बँका का स्वीकारत नाहीत, हा प्रश्नच आहे. त्यांनी बाकी काही केले नाही तरी या पैशातून जेट एअरवेजला मदत करता येईल, असेही माल्ल्याने सांगितले.

Leave a Comment