भारतीय तंत्रज्ञानाची ‘तेजस्वी’ कामगिरी

tejas
एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भारतीय हवाई दलाला त्यांच्या भांडणात ओढत आहेत. राफेल आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यावरून एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत आहेत. दुसरीकडे भारतीय तंत्रज्ञ जगाच्या बाजारात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवत आहेत. मलेशियासारख्या चीनच्या शेजारी देशाने भारताच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाची खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले, त्यामागे हेच कारण आहे.

मलेशिया सरकार आपल्या वायुसेनेसाठी जगातील सर्वात हलके सुपरसोनिक लढाऊ विमान तेजस विकत घेऊ इच्छित आहे. मलेशियातील लंगकावी इंटरनॅशनल मेरीटाइम अॅड एअरोस्पेस प्रदर्शनात (लीमा) भाग घेण्यासाठी दोन तेजस विमान आणि 50 जणांचे पथक मलेशियात दाखल झाले आहे. हे प्रदर्शन मंगळवार, 26 मार्चपासून सुरू होणार आहे. लीमा प्रदर्शनात हे विमान मांडून संपूर्ण जगाला प्रभावित करण्याचा भारताचा इरादा आहे. या लाईट कॉम्बॅट विमानांची हवाई प्रात्यक्षिके, चपळता आणि हँडलिंग यांचे दर्शन या प्रदर्शनात होणार आहे. महासत्ता बनू पाहणाऱ्या देशांच्या बलाढ्य कंपन्यांना मागे टाकून एका भारतीय कंपनीने, तेही सरकारी कंपनीने, जगाची दाद मिळवावी, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे.

तेजस या विमानाचे डिझाईन एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने (एडीए) तयार केले असून एचएएलने त्याचे उत्पादन केले आहे. भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलेले हे विमान संपूर्णपणे भारतात तयार झालेले आहे.

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तेजसची स्पर्धा कोणाशी होती? ती होती चीन आणि पाकिस्तानने उत्पादन केलेल्या जेएफ-17 आणि दक्षिण कोरियाच्या एफ/ए-50 या विमानांशी. मात्र मलेशियाने निवड केली ती तेजसची. मलेशियाने अन्य विमानांच्या तुलनेत तेजसला पसंती दिली आहे, असे भारतीय उच्चायोगातील डिफेन्स अटॅच अनिरुद्ध चौहान यांनी सांगितले.

तेजस विमान जुलै 2016 मध्ये हवाई दलात दाखल झाले. तेजस एमके-आय असे त्याचे अधिकृत नाव असून 2013 मध्ये त्याला आरंभिक परिचालन परवानगी (आयओसी) मिळाली होती. आयओसी मिळाल्यानंतर त्यात नवीन क्षमतांची भर टाकल्यानंतर विमानाला अंतिम परिचालन परवानगी (एफओसी) दिली जाते. दृश्य सीमेपलीकडील लक्ष्यावर क्षेपणास्त्राने मारा करणे, हवेत इंधन भरण्याची क्षमता, हवेतून जमिनीवर मारा करणारे शस्त्र इत्यादी क्षमतांचा त्यात समावेश असतो. तेजसला 20 फेब्रुवारी 2019 रोजी संरक्षण सचिव (संशोधन व विकास) आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे (डीआरडीओ) डॉक्टर जी. सथीथ रेड्डी यांच्या हस्ते एफओसी मिळाली.

हवाई दलात सामील झाल्यानंतर या विमानातून हवाई दलाच्या वैमानिकांनी 1500 पेक्षा अधिक उड्डाण भरले आहेत. ‘हलके लढाऊ विमान’ (एलसीए) नावाच्या कार्यक्रमांतर्गत त्याचा विकास करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरूवात झाली 1980 च्या दशकात. त्याला तेजस हे नाव तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 4 मे 2003 रोजी दिले होते. हवाई दलातील जुन्या होणाऱ्या मिग-21 विमानांचे स्थान ते घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र मिग विमाने आजही कार्यरत आहेत आणि तेजस हवाई दलात प्रत्यक्ष दाखल होण्यास विलंब होत होता.

मलेशियाच्या या तयारीमुळे आपण अभिमानाने भरून जात असलो तरी वास्तविक तेजस हे आपल्या स्वदेशी तंत्रज्ञांच्या अवहेलना आणि उपेक्षेचेही प्रतीक आहे. संरक्षण दलाला लढाऊ विमानांची आत्यंतिक गरज असल्यामुळे राफेल विमानांची खरेदी करण्यात आली. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. त्यावेळी हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाने 1995 मध्ये एचएएलला 20 तेजस विमानांची ऑर्डर दिली होती. मात्र 34 वर्षांमध्ये फक्त एचएएल केवळ 10 विमाने पुरवू शकली आहे. अगदी आता, म्हणजे सोमवार 25 मार्च रोजी, एचएएलने 16व्या तेजस विमानांची निर्मिती झाल्याचे जाहीर केले आहे. “हवाई दलाकडून एचएएलला 40 एलसीएची ऑर्डर मिळाली होती. त्यांतर्गत दिलेल्या लक्ष्यानुसार 16वे एलसीए विमान निर्माण करण्यात आले आहे,”असे एचसीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ते काहीही असले तरी देर आये, दुरुस्त आये या न्यायाने उशीर झाला असला तरी तेजस विश्वाच्या बाजारपेठेत झेप घेण्यासाठी तयार झाले आहे, ही भारतीयांची मान उंचावणारी बाब आहे.

Leave a Comment